वन्यजीव बोर्डाच्या सदस्यांशिवाय मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

राज्याचे वन्यजीव बोर्डाची सदस्य नियुक्ती प्रलंबित असताना बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची १९ वी बैठक झाली. या बैठकीवर वन्यजीव प्रेमींकडून आक्षेप नोंदवला जात आहे. वन्यजीव मंडळावर नवीन सदस्ये निवडली गेलेली नसताना ही बैठक नियमबाह्य असल्याचा मुद्दा उपस्थित होत आहे.
राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत १८ नविन संवर्धन राखीव क्षेत्र घोषित राज्यात १८ नवीन आणि ७ प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली.  त्यामुळे महाराष्ट्रात संवर्धन राखीव क्षेत्रांची संख्या ५२ होणार आहे. त्या माध्यमातून राज्यात सुमारे १३ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित  होणार आहे. मात्र एकही सदस्य नसताना बैठक आयोजित का केली, असा प्रश्न सर्व स्तरावरून विचारला जात आहे.
राज्य वन्यजीव मंडळाची गेल्या सदस्यांची नियुक्ती 9 सप्टेंबर रोजी रद्द केली गेली. नव्या सरकारसह राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्यही नव्याने नियुक्त केले जातात. ही प्रक्रिया प्रलंबित असताना तसेच बोर्डावर कोणत्याही सदस्याची नियुक्ती केलेली नसताना वन्यजीव बोर्डाची बैठक घेऊन निर्णय घेता येत नाही. हा नियम भारतीय वन्यजीव संवर्धन 1972 च्या नियमानुसार नियुक्त सदस्यांपैकी एकही सदस्य नसेल तर निर्णय घेता येत नाही. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक कशी पार पडली, असाही प्रश्न विचारला जात आहे.

 बैठकीतील निर्णय –

या बैठकीत राज्यात १८ नविन संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यात आले. त्यामध्ये पुणे आणि रायगड जिल्ह्यातील वेल्हे-मुळशी (८७.४१ चौरस कि.मी.) आणि लोणावळा (१२१.२० चौरस कि.मी.), पुणे-ठाणे जिल्ह्यातील नानेघाट ( ९८.७८ चौरस कि.मी.), पुणे जिल्हा भोरगिरीगड ( ३७.६४ चौरस कि.मी.), नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (६२.१० चौरस कि.मी.), सुरगाणा ( ८६.२८चौरस कि.मी.), ताहाराबाद (१२२.४५ चौरस कि.मी.), नंदूरबार जिल्ह्यातील कारेघाट (९७.४५ चौरस कि.मी.), चिंचपाडा (९३.९१ चौरस कि.मी.), रायगड जिल्ह्यातील घेरा मानिकगड (५३.२५ चौरस कि.मी.) व अलिबाग (६०.०३ चौरस कि.मी.), ठाणे पुणे जिल्ह्यातील राजमाची (८३.१५ चौरस कि.मी.), ठाणे जिल्ह्यातील गुमतारा (१२५.५० चौरस कि.मी.), पालघर जिल्ह्यातील जव्हार (११८.२८ चौरस कि.मी.), धामणी (४९.१५ चौरस कि.मी.), अशेरीगड (८०.९५ चौरस कि.मी.), सांगली  जिल्ह्यातील आटपाडी (९.४८ चौरस कि.मी.), चंद्रपूर जिल्ह्यातील एकारा (१०२.९९ चौरस कि.मी.) यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here