वरळी कोळीवाडा येथील समुद्र किनाऱ्यावर खेळणारी ८ ते १२ वयोगटातील पाच मुले बुडाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी सायंकाळी घडली, यापैकी तीन मुलांना वाचविण्यात आले असून दोन मुलांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
( हेही वाचा : महापालिकेवरील आरोपावरून शेवाळेंनी आदित्य ठाकरेंचा अशा शब्दात घेतला समाचार)
सविता पाल (१२) आणि कार्तिक चौधरी (८) अशी मृत मुलाची नावे असून आर्यन चौधरी (१०) याची प्रकृती चिंताजनक आहे. इतर दोघांवर उपचार करून घरी सोडून दिले आहे. ही मुले विकास गल्ली, वरळी कोळीवाडा येथे राहण्यास आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही पाचही मुले नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी वरळी कोळीवाडा येथे गेली. वाळूमध्ये खेळत असताना समुद्राचे पाणी वाढल्याचे त्याच्या लक्षात आले नाही, वाढत्या पाण्यामुळे वाळू सरकत जाऊन वाळून मोठा खड्डा पडून पाचही मुले त्यात बुडाली. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ धाव घेऊन मुलांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले, व इतर तिघांना उपचारासाठी दाखल करून घेतले, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेले असून इतर दोघांना उपचार करून घरी सोडण्यात आली. याप्रकरणी दादर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे.
Join Our WhatsApp Community