दळणवळणाने देशाच्या विकासाला चालना मिळत असून याकरिता ‘वंदे भारत’ नावाने नवीन ४०० रेल्वे, बुलेट ट्रेन यासारखे प्रकल्प राबवित आहे. याशिवाय अनेक रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. दळणवळणाच्या साधनांशिवाय विकास साधणे शक्य नाही यासाठी महाराष्ट्राच्या नव्या राज्य सरकारने देखील ६ हजार कोटी रुपये बुलेट ट्रेनच्या विकासासाठी दिले आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी १२ ऑगस्ट २०२२ या दिवशी भगूर येथे दिली.
( हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि राष्ट्रभक्ती समिती यांचा स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त विशेष कार्यक्रम )
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मध्य रेल्वे व सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर वाड्यामध्ये आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत वीर सावरकर वाड्याच्या प्रांगणात तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. वाड्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत त्यांनी अभिवादन केले. तसेच वीर सावरकरांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी व्यासपीठावर खासदार हेमंत तथा अप्पा गोडसे, आमदार सीमा हिरे आमदार राहुल ढिकले, जिल्हाधिकारी डी. गंगाधरन, स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात असिलता सावरकर राजे, सावरकर स्मारकाचे शैलेंद्र चिखलकर, माजी आमदार बाळासाहेब सानप, मध्य रेल्वेचे अतिरिक्त डीआरएम रुकमैया मीना, आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
भगूर परिसरातील सुमारे ३३ स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना दानवे यांनी मध्य रेल्वेच्या माध्यमातून ७५ स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांसाठी विशेष रेल्वे डब्याची व्यवस्था करण्यात येऊन त्यांना अंदमानाची सफर घडवून देण्याबाबत आश्वासन दिले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.
Join Our WhatsApp Community