महिला गुन्ह्यासंदर्भात राज्य शासनाने नव्या गाईडलाईन जारी केल्या आहेत. या गाईडलाईन नुसार, पीडित महिला आणि बालके यांचा जबाब महिला अधिकाऱ्यांनी २४ तासांच्या आत नोंदवून, पीडित महिला आणि बालक यांना ‘महिला व बाल विकास अधिकारी’ यांच्यासमोर हजर करावे, अशी सूचना राज्य गृहविभागाने राज्य पोलिस दलाला दिली आहे.
नव्या गाईडलाईन
साकीनाका प्रकरणानंतर राज्य शासनाकडून महिला आणि लहान मुले यांच्या गुन्ह्यासंदर्भात गंभीर दखल घेण्यात आली आहे. पीडितेने पोलिसांना संपर्क साधल्यास ताबडतोब तिची दखल घेऊन महिला अधिकाऱ्याकडून पीडितेचा जबाब नोंदवण्यात यावा, तसेच या पीडितेला २४ तासांच्या आतच महिला समितीसमोर हजर करण्यात यावे. तसेच लहान मुले यांच्या संबंधी देखील पोलिसांनी हीच काळजी घ्यावी व मुलाचा जबाब नोंदवताना पोलिस उपनिरीक्षक दर्जाची महिला अधिकारी यांची उपस्थिती असणे गरजेचे आहे व पीडित बालके यांना समजेल, अशा सोप्या भाषेत त्यांच्याकडे चौकशी करून त्याची नोंद घेण्यात यावी, असे नवीन गाईडलाईनमध्ये स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : चिमुरड्यांचा जीव घेणा-या ‘त्या’ दोघींना अखेर न्यायालयानं सुनावली ‘ही’ शिक्षा! )
पोलिस विभागाने पालन करावे
अनेक प्रकरणांमध्ये, पीडितेला समितीसमोर उभे करण्यात विलंब होतो, असे आढळून आले आहे, गेल्या वर्षी विरारमध्ये घडलेल्या एका प्रकरणात बलात्कार पीडितेला ४५ दिवसांनी समितीसमोर हजर करण्यात आले होते. विलंबामुळे महिलेने गर्भधारणेचे आठवडे ओलांडले आणि तिला वैद्यकीय उपचार मिळू शकले नव्हते, त्यामुळे यापुढे नवीन गाईडलाइननुसार २४ तासांच्या आत पीडित महिला बालके यांना महिला व बाल विकास अधिकारी यांच्यापुढे हजर करण्यात यावे, अशी सूचना गाईडलाईनमध्ये करण्यात आलेली असून, त्याचे पोलिस विभागाने पालन करावे, असे गृहविभागाकडून सांगण्यात आले आहे. या नवीन गाईडलाईनमुळे पीडित महिला आणि लहान बालके यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळेल.
Join Our WhatsApp Community