येत्या रविवारी १० जुलै रोजी आषाढी एकादशी असून कोविडनंतर दोन वर्षांनी वारी होत असल्याने या वारीसाठी येणाऱ्या भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वारीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेकडून आषाढी वारीसाठी विशेष गाड्यांची सुविधा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे. आषाढी यात्रेसाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी यात्रा स्पेशल जादा रेल्वे गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
प्रथमच रेल्वे गाड्यांच्या १२५ फेऱ्या उपलब्ध
आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या पाहता रेल्वे प्रशासनाने यंदा प्रथमच रेल्वे गाड्यांच्या १२५ फेऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. एसटी तिकीट दरापेक्षा कमी दरात रेल्वेने यात्रेसाठी पंढरीत दाखल होता येणार असल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
(हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच करणार विठुरायाची शासकीय महापूजा!)
कुठून सोडण्यात येणार जादा गाड्या
सुमारे दोन वर्षानंतर आषाढी यात्रा भरत असल्याने यावर्षी १५ लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने यात्रा स्पेशल १२५ जादा फेऱ्या करणार आहे. यात्रा कालावधीत लातूर, नागपूर, अमरावती, खामगाव येथून जादा रेल्वेगाड्या येणार आहेत. याशिवाय दादर-पंढरपूर, नागपूर-कोल्हापूर, निजामाबाद-पंढरपुर, यशवंतपुर-पंढरपूर आधी नियमित रेल्वे गाडी आहे धावणार आहेत.