मुंबईत सोमवारी मुसळधार पावसाच्या वेधशाळेच्या अंदाजाचा पूर्ण फज्जा झाल्याचे चित्र दिवसभर होते. दिवसभरात पावसाचा एक थेंबही मुंबईतील बहुतांश भागात पडला नाही, परिणामी मुंबईतील मुसळधार पावसासाठी येलो अलर्ट जाहीर करणारे मुंबई प्रादेशिक हवामान खाते चांगलेच तोंडावर आपटले. कारण हवामान खात्याच्या अंदाजाला पावसाने हुलकावणी दिल्याचे पाहायला मिळाले.
(हेही वाचा – शिवसेनेतून गळती सुरूच, पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे शिंदे गटात)
या भागात गेल्या ६ तासात पावसाचा थेंबही नाही
दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगर आणि मध्य मुंबईतील बहुतांश भागात पाऊस झाला नाही. वरळीतील हाजी अली, भायखळा, पालिका मुख्यालय परिसर, एल्फिनस्टन रोड, वांद्रे रेकलेमेशन, बोरिवलीतील गोराई या भागात गेल्या सहा तासात पावसाचा एक थेंबही पडला नाही.
या भागात ५ मिलिमीटर पर्यंतच पावसाची नोंद
दहिसर, कांदिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले, धारावी, वडाळा, मानखुर्द, कांजूरमार्ग आणि मुलुंड परिसरात अधूनमधून पावसाचा शिडकावा सुरु होता. या भागात केवळ पाच मिलिमीटर पर्यंतच पावसाची नोंद झाली. परिणामी, मुंबई वेधशाळेच्या अंदाजाचे पुन्हा एकदा हसे झाल्याचे चित्र सगळीकडे दिसून आले. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सलग दोन दिवस मुंबईतील बहुतांश भागात पावसाने दाणादाण उडवली होती, परिणामी यंदाच्या आठवड्यातही पावसामुळे लोकल्स उशिरा धावतात की काय ही भीती चाकरमनी मुंबईकरांना होती. मात्र पावसाचा दिवसभर ब्रेक कायम राहिला.
कार्यालयातून घरी परतताना पावसाने कृपादृष्टी दाखवत सकाळपासूनचा ब्रेक तसाच कायम ठेवल्याने मुंबईकरानी वरुणराजाला धन्यवादही दिले.