बगळा पकडला आणि आरोपीला वनविभागाने बालसंगोपन केंद्रात धाडले

96

बैंगनवाडी येथील फ्लायओव्हर येथे एका मुलाने बगळा हातात घेतल्याचा व्हिडिओ अभिनेता सयाजी शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच व्हायरल केला होता. या व्हिडिओच्या आधाराने बगळ्याला त्रास देणा-या अल्पवयीन आरोपीला वनविभागाने शोधले आणि त्यानंतर त्याची रवानगी थेट उमरखाडी येथील बालसंगोपन केंद्रात केली आहे. मोहम्मद शाह असे बगळ्याला त्रास देणा-या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.

( हेही वाचा : राणीबागेतील आंतरराष्ट्रीय मत्स्यालयाची निर्मिती केवळ कंत्राटदारासाठीच)

हा व्हिडिओ १८ जून रोजी अभिनेता सयाजी शिंदे यांनी आपल्या ट्विटर हँण्डलवर शेअर केला होता. बगळ्याला त्रास दिल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाला त्यांनी जाबही विचारला. मात्र मुलाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळताच बगळ्याला मुलाकडून होणा-या त्रासाबाबत त्यांनी थेट व्हिडिओ रॅकोर्डिंग ट्विटरवर पोस्ट केले. या घटनेची ठाणे प्रादेशिक वनविभागाने दखल घेतली. मानखुर्द येथेच राहणा-या मोहम्मद या अल्पवयीन मुलाला वनाधिका-यांनी शोधले. २१ जूनला आरोपीला उमरखाडी येथील बाल न्यायमंडळात हजर करण्यात आले. त्यावेळी अल्पवयीन मुलाला ४ जुलैपर्यंत उमरखाडीतील बालसंगोपन केंद्रात ठेवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. ही कारवाई ठाणे प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते, साहाय्यक वनसंरक्षक गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचे वनक्षेत्रपाल आर. भोईर, वनपाल रविंद्र तवर, वनरक्षक पंकज कुंभार यांनी केली.

बगळा पाळता येत नाही कारण…

बगळा हा वन्यजीव संरक्षक कायदा १९७२ नुसार चौथ्या वर्गवारीत सुरक्षित आहे. बगळा पकडणे, तस्करी करणे हा वनगुन्हा ठरतो. बगळ्याची अवैधरित्या तस्करी किंवा त्याला विनापरवाना पकडणे किंवा बगळा पाळण्याचा प्रकार आढळून आल्यास १९२६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.