विदर्भातील ब्रह्मपुरीत शेतक-याला ठार करणा-या हल्लेखोर वाघाला अखेर वनविभागाने जेरबंद केले. गुरुवारी सकाळी वनविभागाच्या रेस्क्यू टीमने बेशुद्धीचे इंजेक्शन देत वाघाला जेरबंद केले. टी-१०३ सॅम-१ असे या हल्लेखोर वाघाचे नाव आहे.
( हेही वाचा : ‘उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील अजितदादांचे सरकार’; फडणवीसांची विधानसभेत टोलेबाजी )
जून महिन्यात टी-१०३ सॅम-१ या दोन वर्षांच्या वाघाने केलेल्या हल्ल्यात पहिल्यांदा माणसाचा बळी गेला होता. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत वाघाने केलेल्या हल्ल्यात दोन जणांचा जीव गेला. बुधवारच्या हल्ल्यात विलास रंधये यांना शेतात दहा लोकांच्यासमोरच वाघाने हल्ला करत फरफडत नेले. या घटनेनंतर लोकांच्या मनात असंतोष निर्माण झाला होता.
विलास रंधये यांच्यावर हल्ला केल्यानंतरही टी-१०३ सॅम १ हा वाघ शेताजवळील परिसरातच फिरत होता. गुरुवारी सकाळी वाघाचा भगवानपूर क्षेत्रात वावर सुरु असल्याचे वनाधिका-यांच्या पाहणीत दिसून आले. सकाळी ६ वाजून ४५ वाजता वाघाला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने बंदुकीच्या माध्यमातून डार्ट केले. डार्ट अचूक लागल्याने वाघ बेशुद्ध झाला. सकाळी साडेसातच्या सुमारास टी-१०३ सॅम१ या वाघाला पिंज-यांत डांबण्यात आले.वाघाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला चंद्रपूरातील ट्रान्झिट सेंटरमध्ये हलवण्यात येईल.
दिपेश मल्होत्रा, उपवनसंरक्षक, ब्रह्मपुरी वनविभाग (प्रादेशिक)
कारवाईचे पथक –
ब्रह्मपुरी वनविभागाचे (प्रादेशिक) उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक व वन्यजीव वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक एम बी चोपडे , वनपाल आर.डी.शेंडे, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वन्यप्राणी जलद बचाव टीमचे डॉ रविकांत खोब्रागडे, अजय मराठे तसेच चंद्रपूरचे वन्यप्राणी जीवशास्त्रज्ञ राकेश अहुजा यावेळी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community