तब्बल पाच वर्ष झाली फ्लेमिंगो अभयारण्याला, पण वेळ नाही ठाणे खाडीतील जलप्रदूषण तपासायला

ठाणे खाडीतील वाढत्या जलप्रदूषणाबाबत माहिती अधिकारातून धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ठाणे खाडी क्षेत्रातील खारफुटीचे संरक्षण करणाऱ्या वनविभागाच्या कांदळवन कक्षाने ठाणे खाडीतील पाण्याचे नमुने गेल्या पाच वर्षांत कधीही तपासलेले नाहीत. माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना कांदळवन कक्षाने सांगितले.

ठाणे खाडीला रामसर दर्जा मिळाला असताना तिन्ही बाजूने डंपिंग ग्राउंडने वेढलेल्या या खाडीतील जलप्रदूषणाची पातळी मोजून घेण्यासाठी वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ठाणे खाडी परिसर रामसर क्षेत्र म्हणून जाहीर झाले. रामसर क्षेत्र जाहीर करण्याचे सर्वच निकष पूर्ण होत नसल्याचे वनशक्ती या पर्यावरणप्रेमी संस्थेचे सागरी संवर्धन ग्रुपचे प्रकल्प सल्लागार नंदकुमार पवार यांनी लक्षात आणून दिले. ठाणे खाडीतील जलप्रदूषणामुळे माशांच्या अस्तित्वाला धोका पोहोचला आहे आणि पूर्वी सहज आढळून येणारे मासे लुप्त झाल्याची माहिती पवार यांनी दिली.

वनसंरक्षकांची अरेरावी

तशा आशयाची माहिती 15 ऑगस्ट रोजी ‘ जलप्रदूषणामुळे ठाणे खाडीची वाताहात…’ या आशयची बातमी हिंदुस्थान पोस्टने प्रसिद्ध केली. मात्र या बातमीवर कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी आक्षेप नोंदवला. रामसर समितीने तुमच्याकडून निर्णय घ्यायला शिकायला हवे , अशी टिप्पणी हिंदुस्थान पोस्टच्या प्रतिनिधीला केली. टिप्पणीला विरोध करताच तिवारी यांनी महिन्याभरापासून असहकार्याची भूमिका घेतली आहे.

वनमंत्र्यांच्या हस्ते अभयारण्याचे उद्घाटन

30 मे रोजी तत्कालीन आणि पुन्हा वनविभागाची धुरा सांभाळणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याची स्थापना केली होती. मात्र आजतागायत कांदळवन कक्षाकडून एकदाही खाडीतील जलप्रदूषण ध्यानात घेत पाण्याचे नमुने तपासले गेले नाहीत. वनशक्तीने खासगी प्रयोगशाळेच्या मदतीने केलेल्या पाण्याच्या दर्जाच्या तपासणीत वारंवार ऑक्सिजनची मात्रा कमी आढळली आहे.

रामसर स्थळ जाहीर करणाऱ्या निकषांची पायमल्ली

1) पाणथळ जागेत जलचरांच्या अधिवासासाठी अनुकूल वातावरण असणे

2) माशासाठी अन्नाचा स्रोत असणे. माशांना अंडी घालण्यासाठी संबंधित अधिवास सुस्थितीत असणे.

नष्ट झालेल्या माशांच्या प्रजाती जिताडा,करपाल ( कोळंबीची प्रजाती ),खेकड्यांच्या असंख्य प्रजाती,करकरी,वडा,घावी,निवटी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here