चंद्रपूरातील दूर्गापूर परिसरात आठ जणांचा बळी घेणा-या बिबट्याला आता गोळी घालून ठार करण्याचे आदेश वनविभागाने दिले. या बिबट्याने काही दिवसांपूर्वीच ३ वर्षीच्या मुलीला घरातील अंगणात उभी असताना हल्ला केला होता. या हल्ल्यात मुलीचा जीव वाचला असला तरीही संतप्त जमावाने वनाधिका-यांना गुरुवारी डांबून ठेवले. जोपर्यंत बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले जात नाही, तोपर्यंत संतप्त जमावाने वनाधिका-यांना डांबून ठेवले. अखेर रात्री बिबट्याला मारण्याचे आदेश वनविभागाने जारी केले.
काय आहे प्रकरण?
२०२१ सालापासून आतापर्यंत या बिबट्याने दहा जणांवर हल्ला केला आहे. मानवी वस्तीत घुसून हा सात वर्षांची मादी बिबट्या लोकांवर हल्ला करत आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत आठ जणांचा बळी गेला. याअगोदर १ मे रोजी बिबट्याने ४७ वर्षीय महिलेवर केलेल्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. बिबट्याने जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच बिबट्याने पुन्हा ३ वर्षांच्या मुलीवर हल्ला केल्यानंतर जमावाने काल रात्री गस्तीला आलेल्या वनाधिका-यांना डांबवून ठेवले. त्यावेळीही बिबट्याला पकडण्यासाठी आलेली वन्यप्राणी बचाव पथकाची टीम पहाटे तीन वाजेपर्यंत घटनास्थळी बिबट्याचा शोध घेत होती.
बिबट्याला पकडण्यासाठी अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरु आहेत. मागील हल्ल्यानंतर कॅमेरा ट्रेपमध्ये ही सात वर्षांची मादी बिबट्याचा सतत परिसरात वावर दिसला. हा परिसर संपूर्ण नागरी वस्तीजवळ असल्याने बिबट्याला बेशुद्ध करुन जेरबंद करण्याच्या प्रकार आव्हानात्मक असल्याची प्रतिक्रिया वन्यप्राणी बचाव पथकातील अधिका-यांनी व्यक्त केली. जनतेचा रोष पाहता बिबट्याला गोळी घालणे हा आदेश जारी केला असला तरीही जेरंबद करण्यालाही प्राधान्य राहील. बिबट्याने आक्रमकता दाखवल्यास जनतेच्या सुरक्षेसाठी गोळी घालण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी स्पष्टोक्ती वनाधिका-यांनी दिली.
बिबट्याचे वाढते हल्ले लक्षात घेत जमावाकडून वनाधिका-यांना डांबले गेले. जनतेची मागणी लक्षात घेत रात्री प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांच्या आदेशानंतरच बिबट्याला गोळी घालून ठार करण्याचा आदेश जाहीर केला. त्यानंतरच लोकांनी वनाधिका-यांना सहकार्य केले. या बिबट्याने आतापर्यंत दहा हल्ले केले आहेत. – प्रकाश लोणकर, मुख्य वनसंरक्षक , चंद्रपूर वनविभाग (प्रादेशिक)
बिबट्याच्या हल्ल्यांचा घटनाक्रम
० १ जानेवारी २०२१ – दुर्गापूर येथील सेक्टर ५ जवळ अभिमन्यू सिंगवर बिबट्याने हल्ली करुन जखमी केले.
० १७ जानेवारी २०२१ – दुर्गापूर येथील मनोज दुर्योधन या ४१ वर्षीय इसमाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू
० १६ फेब्रुवारी २०२१ – दुर्गापूर येथील लेबर संकुलातील नरेश सोनावणे या ४० वर्षीय इसमाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू
० २७ सप्टेंबर २०२१ – जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या जोगेश्वर रत्नपारखी या ६८ वर्षीय इसमाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू
० ७ ऑक्टोबर २०२१ – चंद्रपूरात साईराम लेबर कॅम्पजवळ बबलु सिंग या इसमाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू
० ११ नोव्हेंबर २०२१ – अनिल मुजुमकर या ४९ वर्षीय इसमाचा दुर्गापूर येथील ११ केपी सब स्टेशन समोरील काटेरी झुडूपात मृतदेह आढळला.
० १७ फेब्रुवारी २०२२ – राजू उमेश भडके या सतरा वर्षीय मुलाचा दुर्गापूर रिजनल स्टोअर्स परिसरात मृतदेह आढळला.
० ३० मार्च २०२२ – आठ वर्षांच्या प्रतीक बावणे या मुलावर स्मशानभूमी परिसरात बिबट्याने हल्ला केला. त्यातच या मुलाचा मृत्यू झाला.
० १ मे २०२२ – घरातील अंगणात फिरत असताना गीताबाई मेश्राम या ४७ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केला. त्यातच गीताबाई यांचा मृत्यू झाला.
० १० मे रोजी – दुर्गापूर परिसरातील घराजवळ उभ्या असलेल्या ३ वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. घरच्यांनी व स्थानिकांना आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला.