चंद्रपूरातील औष्णिक विद्युत केंद्रात एकामागोमाग एक झालेल्या वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात एका निष्पाप जीवाचा मृत्यू झाल्यानंतर आता प्राण्यांच्या हल्ल्यांच्या पद्धती बदलत आहे. वनविभागाने सावधानता बाळगत आता औष्णिक विद्युत केंद्रात फिरणा-या वाघांना पकडण्याचे आदेश दिले आहेत. औष्णिक विद्युत केंद्रात एक वाघ, मादी वाघ आणि मादी वाघाच्या बछड्यांना पकडण्यासाठी आता वनविभागाची फौज सोमवारपासून औष्णिक विद्युत केंद्रात दाखल झाली आहे.
फरफटत नेत माणसावर होणारा गंभीर हल्ला
गेल्या आठवड्यात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात दोन्ही माणसांना फरफटत नेले गेले. ही धोक्याची घंटा असल्याची भीती ग्रीन प्लेनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली. वाघ आणि बिबट्याने मानवी वसाहतीत स्वसंरक्षणासाठी मानवावर पंजा मारतात. मात्र फरफटत नेत माणसावर होणारा गंभीर हल्ला ही प्राण्यांची शिकारीची पद्धत जीवघेणी होत असून, याबाबत तातडीने हालचाली झाल्या तरच पुढचा संघर्ष टाळता येईल, असेही प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले. एकच प्राणी सातत्याने माणसावर हल्ला करत असल्याचे सिद्ध कऱण्याचे वनविभागाच्या निदर्शनास आल्यानंतरच तो नरभक्षक आहे की नाही, हे वनविभाग जाहीर करते. तूर्तास सुरक्षित उपाययोजनांकडे भर दिला जावा, अशी मागणीही त्यांनी केली.
काय आहे प्रकरण?
चंद्रपूरातील महाविद्युत औष्णिक केंद्रात गेल्या सहा वर्षांपासून वाघ-बिबट्याचा वावर दिसून येत आहे. याआधी वनविभागाच्या नोंदीतही महाविद्युत औष्णिक केंद्रात वाघाचा अधिवास होत असल्याचे दिसून आले आहे. वाघ आणि बिबट्यांचा वावर लक्षात घेता भविष्यात ही वादाची ठिणगी नक्कीच भडकणार, असे भाकीत सहा वर्षांपूर्वीच वन्य जीवप्रेमींनी व्यक्त केले होते. या भागांत अस्वलाचेही अधूनमधून दर्शन होते. दहा दिवसांपूर्वीच ११ हजार २३७ हॅक्टर परिसरातील महाविद्युत औष्णिक विद्युत केंद्रातील मानवी वसाहतीतजवळ वाघ सलग काही दिवस फिरत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरत होता.
या वर्षातील पहिला हल्ला
व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असतानाच बुधवारी भोजरात मेश्राम (५६) या कामगाराला वाघाने जवळपास १०० मीटर फरफटत नेले. या हल्ल्यात मेश्राम यांचे डोकेच वाघाने शरीराबाहेर काढले तर डाव्या हाताचा काही भाग खाल्ला.
दुसरा हल्ला
या हल्ल्याच्या दुस-याच दिवशी गुरुवारी रात्री राजू बडखे (१६) या युवकावर बिबट्याने हल्ला केला. वेस्टर्न कोअलफिल्ड लिमिटेड या भागांतील मैदानात बसलेल्या राजूवर बिबट्याने हल्ला चढवत त्याला ७० मीटर फरफटत नेले. शुक्रवारी राजूचा मृतदेह वनाधिका-यांना मिळाला.
याअगोदरचे हल्ले
- २६ ऑगस्ट २०२० रोजी महाविद्युत औष्णिक वसातहतीतील नागरी वसाहतीतील पाच वर्षाच्या मुलीला बिबट्याने उचलून नेले.
- २ डिसेंबर २०२१ – वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीला जबर जखमा झाल्या होत्या.
(हेही वाचा भराडी देवीच्या जत्रेक जातास, मगे ही बातमी वाचा…)
औष्णिक विद्युत केंद्रातील नागरी वसाहतीतील नागरिकांच्या तक्रारी
या भागांत गेल्या काही वर्षांत सातत्याने वाघांचा प्रामुख्याने वावर दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून मादी वाघ दोन वाघांसह दिसत आहे. या भागांत नर वाघाचाही वावर सातत्याने दिसतोय. गेल्या आठवड्यातील हल्ल्यानंतरही अस्वलही दिसून आला. या प्राण्यांना जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
उर्जामंत्र्यांची भेट
चंद्रपूरातील वाढता मानव-वन्यप्राण्यांचा संघर्ष पाहता उर्जामंत्री नितीन राऊत यांनी रविवारी महाविद्युत औष्णिक विद्युत केंद्राला भेट दिली. राऊत यांनी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन केली. ही समिती महाविद्युत औष्णिक केंद्रातील अधिकारी तसेच वनविभागाच्या कामकाजाची पाहणी करेल. दरम्यान, या दोन हल्ल्यानंतर वनविभागाने स्थापन केलेल्या सहा सदस्यीय समितीच्या अहवालात औष्णिक विद्युत केंद्रात वावरणा-या चारही वाघांना पकडण्याच्या सूचना दिल्या गेल्या. रविवारी रात्री तातडीने या सूचनांच्या आधारे चारही वाघ दिसताचक्षणी पकडण्याचे आदेश वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी दिले.
वनविभागाच्या चार विशेष टीम घटनास्थळी दाखल
सोमवारी सकाळीच वाघांना पकडण्यासाठी वनविभागाच्या चार विशेष टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एका टीममध्ये दहा वनाधिका-यांचा समावेश आहेत. यात पशुवैद्यकीय अधिकारीही आहेत. यासह चंद्रपूर प्रादेशिक वनविभागाची टीमही घटनास्थळी गस्त घालत आहे. सोमवारी सायंकाळी एका टीमला वाघाचे दर्शनही झाल्याचे सांगण्यात येत आहे.
केंद्राच्या संरक्षक भिंतींची उंची वाढवा
महाविद्युत औष्णिक केंद्रातील संरक्षक भिंतींची उंची वाढवण्याचा सूचना वनविभागाने याअगोदरही संबंधित अधिका-यांना केल्या आहेत. सध्या या भिंतीची उंची १२ फूटांपर्यंत आहे. मात्र ती अजून वाढवायला हवी, जेणेकरुन नजीकच्या भागांतून वन्यप्राणी महाविद्युत औष्णिक केंद्रात ये-जा करणार नाहीत, अशी माहिती चंद्रपूर वनविभाग (प्रादेशिक)चे विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे यांनी दिली. उर्जानगर, दुर्गापूर, पद्मापूर आणि अय्यप्पा मंदीर, नेहरु नगर आणि राष्ट्रवादी नगर भागांतील नागरिकांनी सूर्यास्तानंतर तसेच सकाळी लवकर बाहेर पडू नये, असे आवाहनही वनविभागाने केले आहे.
Join Our WhatsApp Community