विदर्भात माणसांवर वाघांचा वाढता हल्ला पाहता पकडलेल्या वाघांना परराज्यातील बचाव केंद्रात पाठवण्याची परवानगी मिळावी याकरिता आता मंत्रालयीन पातळीवर मदत मागितली आहे. विदर्भातील हल्लेखोर वाघ तसेच राज्यातील विविध भागांतून संघर्षमय परिस्थितीतून पकडल्या जाणा-या बिबट्यांना ठेवण्यासाठी पिंजरे कमी पडत असल्याने हल्लेखोर प्राण्यांना परराज्यातील वन्यप्राणी बचाव केंद्रात पाठवता येईल का, याबाबत परवानगी पत्र वनविभागाच्या नागपूर येथील रामगिरी येथील मुख्य कार्यालयातून मंत्रालयातील वनाधिका-यांना पाठवण्यात आले आहे.
राज्यात मानव-वन्यजीव संघर्षात विदर्भात वाघांचे माणसावर वाढते हल्ले आता वादग्रस्त होऊ लागले आहेत. चंद्रपूरात दरवर्षाला वाघाच्या हल्ल्यात किमान ४४ माणसांचा बळी जात आहे. वाढत्या हल्ल्यामुळे वाघांना जेरबंद करा, अशी मागणी स्थानिकांकडून वाढू लागली आहे. राज्यात सद्यस्थितीत केवळ नागूपूर येथील गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील बचाव केंद्रात वाघांना ठेवण्यासाठी जागा आहे. मूळात अकरा वाघांसाठी जागा असलेल्या बचाव केंद्रात किमान १७ वाघ ठेवण्यात आले आहेत. तेरा माणसांचा बळी घेण्याचा आरोप असलेल्या सिटी१ या वाघालाही वाघाच्या आकारमानास पुरेसा पिंजरा नसल्याने इतर प्राण्यांच्या पिंज-यात ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे. अशातच स्थानिकांचा रोष ध्यानात घेता किमान ८ प्राण्यांना जेरंबद करण्याचा निर्णय वनाधिका-यांनी घेतला आहे. बिबट्या पकडले तरीही नागपूर येथील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्र, पुणे तसेच मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या बचाव आणि पुनर्वसन केंद्रात आता जागेची कमतरता आहे. परराज्यातील बचाव केंद्रात जागा उपलब्ध असल्यास प्राणी पाठवता येतील, जेणेकरुन पिंज-यातील जागा रिकाम्या होतील आणि हल्लेखोर प्राण्यांना पकडता येईल आणि लोकांचा रोष कमी होईल, अशी वनाधिका-यांची योजना आहे.
Join Our WhatsApp Community