चंद्रपूरच्या ताडोबात लंगडतेय वाघीण? काय आहे प्रकरण? जाणून घ्या सत्य

149

चंद्रपूर येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून वाघांच्या मृत्यूच्या बातम्या येत आहेत. आठवड्याभरात सहा वाघांच्या मृत्यूची घटना उघडकीस आल्यानंतर जंगलात एक वाघीण जखमी अवस्थेत लंगडत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. अखेरिस वनाधिका-यांनी त्याबाबत स्पष्टीकरण देत वाघीणीच्या हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.

काय आहे नेमके प्रकरण 

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पांगडी बफर क्षेत्रात एक वाघीण जखमी अवस्थेत पर्यटकांना आढळली. तिचा मागचा पाय आणि पंज्याचे हाड खराब असल्याचे पर्यटकांच्या लक्षात आले. वाघीणीने रविवारी गाय मारल्याचेही काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. वाघीणीला जखमेमुळे स्वतःहून शिकार करता येणार नाही. वाघीण आणि तिच्या बछड्यांची उपासमार होऊ शकते, अशी भीती वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली. वाघीणीला वनाधिका-यांनी पकडून तिला उपचार द्यावेत, तसेच बछड्यांचीही काळजी घ्यावी, अशी मागणी जोर धरु लागली.

वनविभागाची भूमिका 

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक व क्षेत्र संचालक डॉ जितेंद्र रामगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टी-४ नावाची वाघीण आहे. वाघीणीचे वय १४ ते १५ वर्ष आहे. तिला १४-१५ महिन्यांचे दोन बछडेही आहेत. पांगडी बफर क्षेत्र तसेच अतिसंरक्षित जंगल परिसरात तिचा वावर दिसून येतो. टी-४ पहिल्यांदा १८ नोव्हेंबरला वाघीण हिरडीनाला परिसरात लंगडत असल्याचे दिसून आले होते. २४ नोव्हेंबरला वाघीणीने गायीची शिकार केल्याचे छायाचित्र वनाधिका-यांना मिळाले. २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान, टी-४ कुकडहेटी आणि पांगडी गावाजवळच्या संरक्षित क्षेत्रात फिरत होती. ४ डिसेंबरला वाघीणीने रानडुक्कराची शिकार केली. त्यावेळी तिचे बछडेही सोबत होते.

(हेही वाचा – ‘तोंड आवरा, पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये’, शिंदे गटातील ‘या’ मंत्र्याचा राऊतांना थेट इशारा)

वाघीणीचा वावर पाहता, तिच्या नियमित आणि नैसर्गिक हालचाली व्यवस्थित सुरु आहेत. टी-४ चे बछडेही व्यवस्थित आहेत. वाघीणीला जेरबंद करुन वैद्यकीय उपचारांची आवश्यकता नाही. तिच्यावर वनाधिका-यांची देखरेख सुरु असून, परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असेही डॉ रामगावकर यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.