चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथून बिबट्या जेरबंद

110

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील डिफेन्स वसाहतीतून रविवारी रात्री बिबट्याला जेरंबद करण्यात वनविभागाला यश आले. गेल्या पंधरा दिवसांत भद्रावती येथील रहिवासी संकुलातीन दोन लहान मुलांवर बिबट्याचा हल्ला झाला होता. या घटनेनंतर संतप्त जमावाने परिसरातील हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी जोर धरला होता. मात्र रविवारी रात्री जेरबंद झालेला बिबट्या हा लहान मुलांवर हल्ला करणारा बिबट्याच आहे की नाही, याबाबत कोणतीही खात्रीलायक माहिती वनविभागाने दिलेली नाही.

भद्रावती येथील डिफेन्स वसाहतीत गेल्या दोन आठवड्यांत चार वर्षांच्या आणि दीड वर्षांच्या मुलीवर बिबटयाचा हल्ला झाला होता. या दोन्ही ठिकाणांमध्ये किमान पाचशे मीटरचे अंतर आहे. दोन्ही घटनांनंतर परिसरातील लोकांमध्ये घबराहटीचे वातावरण असल्याने वनविभागाने हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्याचा निर्णय घेतला. गेल्या पाच दिवसांपूर्वी एका शाळेतही बिबट्या येऊन गेला होता. बिबट्याच्या वावर भद्रावती येथे सर्रास दिसून येत आहे. वन्यप्राण्यांच्या सततच्या वावरामुळे वनविभागाच्या जनजागृती कार्यक्रमाला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. परंतु सलग दोन बिबट्याचे हल्ले लहान मुलांवर झाल्याने लोकांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली.

(हेही वाचा – राणा म्हणताय, “…म्हणून श्रीरामांनीच उद्धव ठाकरेंचा धनुष्यबाण हिसकावून घेतला”)

वाढता जनप्रक्षोभ लक्षात घेत गेल्या पंधरा दिवसांपासून वनविभागाने भद्रावती येथील डिफेन्स वसाहतीतीत बिबट्याला पकडण्यासाठी ट्रेप कॅमेरे लावले होते. रात्री एका पिंज-यात बिबट्या जेरबंद झाला. बिबट्याला घटनास्थळातून जेरबंद करत वीस मिनिटांतच वनाधिका-यांची टीम त्याच्या शारिरीक तपासणीसाठी रवाना झाली. बिबट्याची सायंकाळी शारिरीक तपासणी होईल. त्यानंतर बिबट्याला सोडायचे की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वनाधिका-यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.