ठाण्यातील तलावांमधील जलप्रदूषणाचा कासवांना धोका

144

ठाण्यातील तलावांमधील वाढत्या जलप्रदूषणाचा फटका कासवांना बसू लागला आहे. ब्रह्मपुरी तलावातून काही दिवसांपूर्वीच सापडलेल्या लेथ शेल्फ टर्टल या कासवाला न्यूमोनियाचे निदान झाले आहे. तलावात मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण असल्याने वाढत्या जलप्रदूषणाविरोधात वनविभागाने ठाणे महानगरपालिकेला पत्र लिहून जलप्रदूषण रोखण्यास सांगितले आहे. ब्रह्मपुरीसह ठाण्यातील अंदाजे 30 ते 35 तलावातील जलचरांना वाचवण्यासाठी तलावात थेट सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करा, तलावातील पाण्याच्या दर्जा सुधारा, असेही पत्र वनविभाग देणार आहे.

( हेही वाचा : नवी मुंबईतील आश्रमशाळेतील लैंगिक अत्याचारामुळे सर्व आश्रमशाळांची चौकशी करणार – आदिवासी विकासमंत्र्यांची घोषणा)

रविवारी ब्रह्मपुरीतील तलावाबाहेर आलेले लेथ शेल्फ टर्टल हे कासव बराच काळ पाण्यात परत जाण्याचा प्रयत्न करत होते. तलावात पोहताना कासवाला अडचणी येऊ लागल्या, त्यामुळे स्थानिकांनी वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन (डबल्यूडबल्यूए)या प्राणीप्रेमी संस्थेला मदतीसाठी बोलावले. डबल्यूडबल्यूएच्या चार स्वयंसेवकांनी कासावाला उचलून पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. 18 किलोच्या मादी लेथ शेल्फ टर्टलचे अंदाजे वय पंचवीस वर्षे आहे. उपचारानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आल्याची माहिती डबल्यूडबल्यूएचे सदस्य आणि ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी दिली.

गोठ्यातील शेण तलावात सोडले जाते

डबल्यूडबल्यूएच्या सदस्यांनी तलावाची पाहणी केली असता तलावात अंदाजे 15 लेथ शेल्फ प्रजातीची अजून कासवे असण्याची शक्यता आहे. गोठ्यातील शेण सर्रास तलावात टाकले जाते. तलावातील जलप्रदूषणाची पातळी तपासण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. या तपासणीचा अहवाल प्रलंबित आहे.

ठाण्यातील तलावात सांडपाणी टाकले जाते. परिणामी जलचरांच्या आयुष्याला धोका पोहोचत आहे. तलावात लेथ शेल्फ टर्टल ही कासवाची प्रजाती भारतीय वन्यजीव संवर्धन कायद्यानुसार संवर्धित आहे. हे कासव मोठ्या संख्येने ब्रह्मपुरी तलावात असतील तर सांडपाणी तलावात थेट सोडता कामा नये यासाठी वनविभाग ठाणे महानगर पालिकेला पत्र लिहिणार आहे.
– गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक, ठाणे वनविभाग ( प्रादेशिक )

लेथ शेल्फ टर्टल प्रजाती मुंबई व नजीकच्या प्रदेशात आढळून येत नाही. मुंबई महानगर परिसर त्यांचा मूळ अधिवास नाही. नाशिक येथे हे कासव आढळतात. ब्रह्मपुरी तलावात हे कासव कोणीतरी सोडले असेल असा अंदाज ठाणे वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.