…आणि माजी सरपंचाने गर्भवती महिला वनरक्षकाला बेदम मारले

129

वनरक्षक सिंधू सानप यांना माजी सरपंच रामचंद्र जानकर आणि प्रतिभा जानकर या दाम्पत्याने बेदम मारहाण केली. वनरक्षक सानप या तीन महिन्यांच्या गर्भवती आहेत. त्यामुळे लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. प्रकरणी सिंधू सानप यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पैसे खाऊ देत नसल्याने मारहाण

याबाबत वनरक्षक सिंधू सानप यांनी म्हटले की, माजी सरपंच हे वारंवार पैशांची मागणी करत होते. मला धमकी द्यायचे. मी त्यांना शासकीय कामातील पैसे खाऊन देत नव्हते. आमची ट्रान्जेस्ट लाईन सुरु होती. मला त्यांनी दोन दिवसांपूर्वी धमकी दिली. मी परत येत असताना मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. माझ्या पतीला देखील चप्पलने मारहाण केली असल्याचे सिंधू सानप यांनी सांगितले.

(हेही वाचा नायलॉन मांजाची सर्रास विक्री! उच्च न्यायालयाने काय दिला आदेश?)

सिंधू सानप यांच्या पतीलाही मारहाण

सानप यांचे पती सूर्याजी ठोंबरे हे देखील वनरक्षक आहेत. त्यांनी सांगितले की, सानप यांना धमक्या मिळाल्यामुळे मला आमच्या वरिष्ठांनी त्यांच्यासोबत जाण्यास सांगितले. आम्ही गस्तीवर असताना प्रतिभा जानकर यांनी मला चप्पलने मारहाण केली. यावेळी सानप मला सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असताना जानकर पती-पत्नींनी मला सोडून सानप यांना मारहाण केली, असे ठोंबरे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरेंचं ट्विट

या प्रकरणात ठाकरे सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं, आरोपीला आज सकाळी अटक करण्यात आली असून त्याला कठोर शिक्षेचा सामना करावा लागणार आहे. अशा प्रकारचे कृत्य खपवून घेतले जाणार नाही.

महिला आयोगानेही घेतली दखल

साताऱ्यात पळसवडे गावच्या माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी एका महिला वनरक्षकास लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून याबाबत सातारा पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत, असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.