लक्ष्मण सिवारामकृष्णन (Laxman Sivaramakrishnan) हे माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याचे क्रिकेट समालोचक आहेत. ते उजव्या हाताचे लेग-स्पिनर होते. त्यांना त्यांचे मित्र आणि क्रिकेटजग ’सिवा’ आणि ’एलएस’ म्हणून हाक मारायचे.
सिवा यांचा जन्म ३१ डिसेंबर १९६५ रोजी मद्रास येथे झाला. त्यांनी मद्रास आंतरशालेय चॅम्पियनशिप गेममध्ये २ धावा देऊन ७ विकेट्स काढल्या होत्या. हा चमत्कार त्यांनी वयाच्या १२व्या वर्षी केला. १५व्या वर्षी, १९८० मध्ये रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा दौरा करणाऱ्या अंडर-१९ भारतीय संघातील ते सर्वात तरुण खेळाडू होते.
१९८१ मध्ये वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी प्रथम श्रेणीतील कारकीर्दीला सुरुवात केली. १९८१/८२ च्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत दिल्ली क्रिकेट संघाविरुद्ध पदार्पण करताना, त्यांनी दुसऱ्या डावात २८ धावा देऊन ७ बळी घेतले. दुलीप ट्रॉफीमध्ये त्यांना पहिल्या डावात विकेट मिळाली नाही, मात्र दुसऱ्या डावात त्यांनी पाच बळी घेतले. यामध्ये सर्वात महत्वाची विकेट होती सुनील गावस्करांची. गावस्करांना गुगली टाकून त्यांनी बाद केले.
सिवारामकृष्णन (Laxman Sivaramakrishnan) एक उत्कृष्ट बॉलर होते. १२ नोव्हेंबर २००० रोजी त्यांनी भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यातून समालोचन करिअरची सुरुवात केली. ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीवर खेळाडूंचे प्रतिनिधी म्हणूनही काम करतात.
Join Our WhatsApp Community