स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदासाठीचे उमेदवार माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित

132

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. त्यांचे सूचक म्हणून ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन आणि अनुमोदक सावरकर साहित्याचे अभ्यासक चंद्रशेखर साने आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या २६ डिसेंबर २०२१ ला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये अध्यक्षपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. स्मारकाचे कार्य अतिशय उत्तमरीतीने सुरू असून स्मारकाच्या कार्याला अधिक उंचीवर नेण्याचा निर्धार प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केला.

समविचारी मंडळींचा एक दबावगट निर्माण करणार

सावरकरांची बदनामी करणाऱ्या ‘एबीपी माझा’, ‘द वीक’ यांना माफी मागण्यास स्मारकाने भाग पाडले आहेच. स्मारक तर सावरकरांची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात लढा देईलच, पण समविचारी मंडळींचा एक दबावगट निर्माण करण्याचाही स्मारकाचा प्रयत्न असेल, असेही दीक्षित यांनी स्पष्ट केले. सावरकर स्मारकाचे ३० पेक्षा अधिक उपक्रम असून ५० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोनाच्या वैश्विक महामारीत सावरकर स्मारकापुढेही आर्थिक अडचण होती. आवक बंद झाली होती, तरीसुद्धा स्मारकाने सर्व कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन दिले. सामाजिक जाणिवेतून एका इस्पितळाला पाचशे पीपीई किट्स तसेच पोलिस आणि महानगरपालिकेसाठी दहा हजार मास्क पुरवले आणि मुख्य म्हणजे कोरोना काळात स्मारकाचे अनेक नियोजित आणि नवे उपक्रमही ऑनलाईन सादर झाले.

(हेही वाचा १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील विजयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष!)

स्मारक यशाची नवी शिखरे पादाक्रांत करणार

गेल्या पंधरा वर्षांत सावरकर स्मारक एका वेगळ्या उंचीवर पोहोचले आहेच, पण पुरातत्व खात्याच्या दत्तक योजने अंतर्गत भगूरमधील ‘सावरकर वाड्या’च्या देखभालीचा मिळालेला सन्मान, त्यानंतर तिथं वाढलेली पर्यटकांची वर्दळ हे विशेष आहे. जेएनयू या डाव्यांच्या गढीत ‘हे मृत्युंजय’ या नाटकाचे दोन प्रयोग, दिल्ली विद्यापीठातील प्रयोग हे स्मारकाचे फार मोठे यश आहे. हिमाचल प्रदेशातील एका शिखराचे ‘शिखर सावरकर’ नामकरण करणे आणि गिर्यारोहण क्षेत्रासाठी तीन ‘शिखर सावरकर पुरस्कार’ सुरू करणे हे स्मारकाचे देदीप्यमान यश आहे. स्मारकाच्या विद्यमान कर्तृत्ववान पदाधिकाऱ्यांच्या मागे ठाम उभे राहून स्मारकाची वाटचाल अशीच अखंडित राहण्यासाठी मी प्रयत्नशील असेनच. तसेच येणाऱ्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यशाची नवी शिखरे पादाक्रांत करेल, असा ठाम विश्वास स्मारकाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केला.

सावरकर विचार तरुणाईपर्यंत पोहचवणार

येत्या काळात सावरकर स्मारकाच्या शाखा देशभरात आणि जागतिक पातळीवर सुरू करणे, मार्सेलीस येथे सावरकर स्मारक बनवण्यासाठी सध्या सुरू असलेल्या स्मारकाच्या प्रयत्नांना मूर्त रूप देणे, तरुणाईपर्यंत सावरकर विचार पोहोचवण्यासाठी आधुनिक माध्यमांचा पुरेपूर वापर करणे, सावरकर साहित्य नव्या माध्यमातून पुन्हा एकदा पुढे आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याला प्राधान्य राहील, असेही प्रवीण दीक्षित यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.