नॅशनल स्टाॅक एक्सचेंज कर्मचा-यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी दिल्ली न्यायालयाने जामीन दिल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची बुधवारी रात्री तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली. पांडे यांना जुलैमध्ये अटक झाल्यानंतर त्यांनी जवळपास पाच महिने तुरुंगात काढले. दिल्ली उच्च न्यायालयाने 8 डिसेंबर रोजी पांडेंना जामीन मंजूर केला होता. संजय पांडे 30 जून 2022 रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांच्या आत त्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. निवृत्तीनंतर अटक होणारे संजय पांडे हे तिसरे मुंबई पोलीस आयुक्त आहेत.
( हेही वाचा: सत्तेचा दुरुपयोग करून मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात काय पुरुषार्थ? नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल )
CBI आणि ED चा आरोप
अंमलबजावणी संचालनालयाने यावर्षी सप्टेंबरमध्ये दिल्ली न्यायालयात NSE कर्मचा-यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाशी निगडीत मनी लाॅंड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. जुलैमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली होती. 2009 ते 2017 या काळात पांडेंनी बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. 5 जुलै रोजी मनी लाॅंड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीने संजय पांडेंना सर्वप्रथम बोलावले होते. 1986 च्या बॅचच्या निवृत्त भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी संजय पांडेंची या प्रकरणी सात तासांहून अधिक चौकशी झाल्यानंतर केंद्रीय तपास संस्थेने अटक केली.
पांडे हे 30 जून रोजी सेवेतून निवृत्त झाले. संजय पांडे यांच्या कंपनीने जवळपास आठ वर्षे नॅशनल स्टाॅक एक्सचेंजच्या कर्माचा-यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. त्यानंतर विशेष न्यायालयाने पांडेंना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेश दिले. तसेच, पांडेंना त्यांचा पासपोर्ट सरेंडर करण्याचे, त्यांचा मोबाईल नंबर तपास अधिका-यांना देण्याचे तसेच, जामीन कालवधीत भारत सोडू नये असे निर्देश देण्यात आले होते.