सायली डिंगरे
उन्हाळी सुट्टी म्हटली की, फिरायला कुठे जायचे याचे नियोजन सुरु होते. बरेच जण एखाद्या पर्यटनस्थळी, विदेशात जातात. वेगवेगळ्या नैसर्गिक ठिकाणी जाणे, मजा-मस्ती करणे हे हवेच; मात्र त्यासोबत सुट्ट्यांच्या निमित्ताने आपली प्राचीन संस्कृती जाणून घेणे, आपला विजयी इतिहास जाणून घेणे यात वेगळा आनंद आहे. ऐतिहासिक गड-किल्ले भारतीय वास्तूकलेचे, शौर्याचे वाहक आहेत. किल्ले पाहून तेव्हाचा इतिहास जागा होतो, हिंदूंच्या तेजस्वी राजांच्या शौर्याची आठवण होते. येणारी सुट्टी कारणी लागण्यासाठी महाराष्ट्रातील काही वैशिष्ट्यपूर्ण गड-किल्ल्यांची माहिती नक्की वाचा ! (Forts in Maharashtra)
छत्रपतींचे जन्मस्थान : शिवनेरी (Shivneri)
जुन्नर गावाजवळ पुण्यापासून अंदाजे १०५ कि.मी.वर असलेला शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे देऊळ व जिजाबाई, बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नरमध्ये शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंथात या किल्ल्यावर हजार कुटुंबांना ७ वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे, असा उल्लेख केला आहे.
गडावर शिवाई देवी देऊळ, अंबरखाना, पाण्याची टाकी, शिवकुंज, शिवजन्म स्थान इमारत, कडेलोट कडा ही या किल्ल्यावरील पहाण्यासारखी स्थाने आहेत.
हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेला रायरेश्वर
रायरेश्वराचे (Raireshwar) पठार हे ५ ते ६ कि.मी. पसरलेले आहे. पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोल्हेश्वर, रायगड, लिंगाणा, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर, रुद्रमाळ, चंद्रगड, मंगळगड हा सर्व परिसर येथून दिसतो. रायरेश्वराला जाण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणत्याही मार्गाने जायचे झाल्यास भोर गावं गाठावे.
वयाच्या १६ व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर या आपल्या बारा मावळातील सवंगडी यांच्या साथीने २७ एप्रिल १६४५ रोजी स्वराज्याची शपथ घेतली.
हिंदवी स्वराज्याचे तोरण असलेला : तोरणा
तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वांत उंच डोंगर. शिवाजी महाराजांनी घेतलेल्या पहिल्या काही किल्ल्यांपैकी हा एक किल्ला होता.
पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. एका पदरावर तोरणा व राजगड आहेत, तर दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग, असे म्हणतात. शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेला हा पहिला किल्ला आहे. हा किल्ला जिंकल्यामुळे स्वराज्याचे तोरण बांधले गेले; म्हणून याला तोरणा असे नाव दिले गेले. महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव ‘प्रचंडगड’ असे ठेवले. किल्ल्याच्या दक्षिणेस वेळवंडी नदी, तर उत्तरेस कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेस कानद खिंड, तर पूर्वेस बामण आणि खरीव खिंडी आहेत.
पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तालुक्याचे गाव तोरणाच्या पायथ्याशी आहे. पुणे-वेल्हे अंतर ६० कि.मी आहे. पुणे-नसरापूर-वेल्हे, पुणे-पानशेत-वेल्हे व पुणे-खानापूर-पाबे मार्गे वेल्हे अशा मार्गांनी तोरणा गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते.
हिंदवी स्वराज्याची राजधानी : रायगड
रायगड (Raigad) किल्ल्याची उंची २९०० फूट आहे. महाडच्या उत्तरेस २५ कि. मी. वर हा किल्ला असून याची समुद्रसपाटीपासूनची उंची २८५१ फूट आहे. रायगड हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयाला आकाश स्वच्छ असेल तर राजगड, तोरणा दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो. रायगडपासून मुंबई, पुणे, सातारा ही शहरे सारख्याच अंतरावर आहेत. सह्याद्रीतील किल्ल्यांच्या रांगांतील हा एक दुवा आहे. रायगड हा निसर्गतःच डोंगरांनी वेढलेला असल्यामुळे (तसेच) शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव व्हावा, यासाठी पुणे सोडून पश्चिम डोंगरात रायगड ही राजधानी महाराजांनी निवडली.
पाचाडचा जिजाबाईंचा वाडा, खुबलढा बुरूज, नाना दरवाजा, मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा, महादरवाजा, चोरदिंडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, स्तंभ, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राजभवन, रत्नशाळा, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ, शिर्काई देऊळ, जगदीश्वर मंदिर, महाराजांची समाधी, कुशावर्त तलाव, वाघदरवाजा, टकमक टोक आणि हिरकणी टोक ही स्थळे रायगडावर पाहण्यासारखी आहेत.
छत्रपतींनी जिंकलेला अभेद्य जलदुर्ग : जंजिरा
महाराष्ट्राला मोठा सागर किनारा लाभला आहे. या किनाऱ्यावर असलेल्या जलदुर्गांमध्ये रायगड जिल्ह्यातील जंजिरा (Murud-Janjira Fort) हा एक अभेद्य किल्ला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र (खरे नाव सिंधूसागर) आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुका वसलेला असून तालुक्याचे मुख्य ठिकाण मुरुड येथेच आहे. मुरुडमधून चार पाच किलोमीटर अंतरावर राजपुरी हे गाव आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. येथून जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.
जंजिऱ्याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडेही एक दरवाजा आहे. एकोणीस बुलंद असे बुरुज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर ५१४ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात. (Forts in Maharashtra)
Join Our WhatsApp Community