देशभक्त गणेशपंत दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर

117

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि वीराग्रणी डॉ. नारायणराव दामोदर सावरकर यांचे जेष्ठ बंधू, क्रांतिकारी, अंदमानदंडित, लेखक, विचारवंत, थोर हिंदुसंघटक, तरुण हिंदूसभेचे संस्थापक क्रांतिवीर श्री. गणेशपंत दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर यांची आज ७८ वी पुण्यतिथी (१३ जून १८७९ – १६ मार्च १९४५).

स्वातंत्र्याचा ध्यास ।
दे कुणास कठोर कारावास ।।
कुणास विरहोच्छ्वास ।
कुणी हो जननिंदेचा घास ।।
अंदमानचा वास ।
कुणाच्या गळ्यात येई फास ।।
शाईने का लिहिला जाई ।
राष्ट्राचा इतिहास ।।

‘या स्वातंत्र्ययुद्धात जे जे योद्धे लढले, रणी पडले, त्यात काहींची नावें दोन चार दिवस लोक आठवतील, तर काहींचा लोकांना पत्ताही लागणार नाही. पण श्रेय दोघांना समान..! त्यातल्या त्यात पुतळा उभारावयाचा तर तो आपल्यासारख्या कर्मवीराचाच!’ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असा ज्यांचा गौरव केला ते अर्थातच बाबाराव सावरकर होय.

दे. भ. बाबाराव हे कुटुंबवत्सल थोरामोठ्यांशी गप्पागोष्टी, हास्यविनोद करीत. तसेच ते शिस्तीचे मोठे भोक्तेदेखील होते. सर्व गोष्टी वेळच्या वेळी घडल्याच पाहिजेत. तसेच घरातील वस्तूदेखील जागच्या जागी असल्याच पाहिजेत, असा त्यांचा दंडक होता. त्यांना स्वच्छता, टापटीपपणा आणि नीटनेटकेपणा खूप आवडत असे.

लहानपणापासून बाबारावांना योगशास्त्राचा नाद होता. तसे तर बाबाराव हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांना भगवद्गगीतेचे वाचन तर वेदांत विषयात विशेष रुची होती. योगी लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे बाबारावांवर तसे संस्कार होते. क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्य चळवळीत नि व्यक्तिगत जीवनात बाबारावांनी सुदृढ आणि बलवान तसेच शरीरयष्टीला खूप महत्त्व दिले आहे. प्रत्येक तरुणाने रोजनिशी व्यायाम करून सशक्त असायला हवे, असा त्यांचा नियम होता. बाबाराव घरातील लहान मुलांकडून देखील दंड, बैठका, सूर्यनमस्कार करून घेत असायचे. ते स्वतः प्राणायाम तसेच ध्यान धारणा करून मन एकाग्र करीत तासन् -तास बसायचे. अंदमानात बाबारावांनी तात्यांसोबत शुद्धीकार्यदेखील केले आहे. बाबाराव भाषाशुद्धीचे तसेच लिपीशुद्धीचे पुरस्कर्ते होते. येथेच त्यांनी भाषाशुद्धीचे काम केले. इंजेक्शनला ‘सूचीकाभरण’, बॅटरीला ‘विजेरी’, फाऊंटनपेनला ‘निर्झरणी’ असे शब्द ते म्हणत असत. बऱ्याच जणांना माहिती नाही की, ‘दिनांक’ हा शब्द बाबांचा आणि ‘क्रमांक’ हा शब्द तात्यांचा. ‘हुतात्मा’ हा शब्द तात्यांचा आणि हे सगळे ‘प्राचार्य’, ‘अध्यापक’, ‘मध्यंतर’, ‘दिग्दर्शक’ हे सर्वच शब्द तात्यांचे. परंतु ‘दिनांक’ जो शब्द आपण वापरतो तो बाबारावांचा आहे. ती मात्र त्यांची कॉन्ट्रिब्यूशन आहे.

बाबारावांनी ‘धर्म कशाला हवा’, ‘ख्रिस्त परिचय – अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व’, ‘वीररत्न मंजुषा’, ‘वीर बंदा बैरागी’, ‘आग्र्यावरील गरुडझेप’, ‘राष्ट्रमीमांसा’, ‘हिन्दुराष्ट्र (पूर्वी-आता-पुढे)’ इत्यादी पुस्तके लिहिली. त्यातील ‘वीर बंदा बैरागी’ आणि ‘हिन्दुराष्ट्र (पूर्वी-आता-पुढे)’ ही दोन पुस्तके ब्रिटिश शासनाने जप्त केली होती.

‘सावरकर सदन’मध्ये राहात असतांना बाबाराव आणि आपल्या दोन्ही बंधूंना भेट म्हणून मिळालेली विविध पुस्तके घरातील लहान मुलांकडून गटवारीप्रमाणे बाबाराव स्वतः लावून घ्यायचे. या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने महाभारताचे बारा खंड, संपूर्ण रामायण तसेच स्वामी विवेकानंदांची हिंदू तत्वज्ञानावरील पुस्तके, पंडित महादेवशास्त्री दिवेकर यांच्या पुस्तकांचा देखील समावेश असायचा. अशारीतीने बाबारावांचा धार्मिक संस्कार पाळण्याकडे नित्य कल असायचा. दे. भ. बाबाराव सावरकरांचे जीवन म्हणजे रत्नांची एक खाणच्या खाण होती.

बाबाराव खरेतर योगीच झाले असते. परंतु व्यक्तिगत मोक्षाचा मोह टाळत त्यांनी आपले आयुष्य देशकार्याला समर्पित केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर लंडनला गेल्यावर अभिनव भारत संघटनेची संपूर्ण जबाबदारी बाबारावांनी आपल्या खांद्यावर घेतली. बाबाराव सावरकर हे काही कवी नव्हते की, कविता लिहीत होते. आपल्या या हिंदुस्थानातील क्रांतिकारकांना ज्यांच्या कविता वाचून स्फूर्ती अन् सदैव नवचैतन्य प्राप्त होई, असे स्वातंत्रसूक्ते लिहिणाऱ्या ‘अभिनव भारत’ या सशस्त्र संघटनेतील दोन्ही पायांने पंगू असलेल्या गोविंदआबा दरेकर या कवीची ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ या प्रतिभाशाली कवितेसोबत अजून दोन कविता प्रसिद्ध केल्या, म्हणून बाबाराव यांना १९०९ या वर्षी जन्मठेपेची शिक्षा होऊन त्यांना अंदमानात पाठविण्यात आले. तेथे त्यांचा अपरिमित छळ करण्यात आला. त्यांना अंदमानाच्या कोठडीत विजेचे धक्के दिले जात. अंदमानातून बाबाराव सुटले तेव्हा मरणासन्न अवस्थेतच होते. तरीही सुटकेनंतर त्यांनी स्वतःला पुन्हा क्रांतिकार्यात झोकून दिले. हुतात्मा चंद्रशेखर आजाद, हुतात्मा राजगुरू अशा देशातल्या बहुसंख्य क्रांतिकारकांच्या संपर्कात ते होते. एम्पायर सिनेमा बॉम्ब केस प्रकरणात बाबारावांना अटक करून पुन्हा चार वर्षे नाशिकला स्थानबद्ध करून ठेवले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उभारणीत बाबाराव सावरकरांनी बहुमोलाची भूमिका बजावली. त्यांनी स्वतःची तरुण हिंदूसभा संघात विलीन तर केलीच पण घरोघरी जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी निधीदेखील गोळा केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक सामर्थ्यशाली संघटन बनावे यासाठी बाबाराव सावरकरांनी पाचलेगावकर महाराज यांचे मुक्तेश्वर दल आणि अनेक छोट्या मोठ्या संघटना संघात विलीन करविल्या. स्वतः पाचलेगावकर महाराज संघाचे प्रतिज्ञाबद्ध स्वयंसेवक झाले. बाबाराव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विस्तारात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. आपल्या अंतिम श्वासापर्यंत बाबारावांनी संघकार्य सोडले नाही. बाबारावांना दिवसरात्र संघाच्या उत्कर्षाची काळजी लागलेली असायची. ‘हिंदुत्वाचे जे कार्य, ते आपले कार्य! हा तरुण हिंदूसभेचा बाणा आहे; तेव्हा हिंदूंच्या उत्कर्षासाठी स्थापन होणाऱ्या संघाला सभेच्या सभासदांनी सहाय्य केलेच पाहिजे’, अशी बाबारावांची विचारसरणी होती. अखेर बाबारावांनी स्थापन करून वाढविलेली ‘तरुण हिंदू महासभा’ ही संघटना १९३१ यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विलीन केली.

संघाच्या पहिल्या शाखेवर जो पहिला ध्वज लावला गेला तो डॉ. हेडगेवार यांनी बाबारावांकडून सिद्ध करून घेतला होता. दोन त्रिकोणाचा, भगवा असा तो संघाचा विजीगीषू ध्वज बाबाराव सावरकरांच्या हातून निर्माण झाला. बाबारावांनी त्याला आकार नि रंग दिला. जे हात केवळ राष्ट्रकार्यासाठी तप नि तप झिजले त्या हातांनी संघाचा आद्य ध्वज सिद्ध झाला. ज्या हातांनी पुढे कुंडली-कृपांणांकित अखिल हिंदुध्वजाचा प्रसार केला त्याच हातांनी संघाच्या पहिल्या झेंड्याला जन्म दिला. यात पूजनीय डॉ. हेडगेवार यांचा तरी केवढा समर्पकपणा! त्यांनी एखाद्या अलबत्या गलबत्या माणसाकडून आपल्या संघाचा आद्य ध्वज करून न घेता तो बाबाराव सावरकरांसारख्या कष्टभोगी, त्यागी देशभक्ताकडून करवून घेतला. डॉ. हेडगेवार यांनी ध्वजाप्रमाणेच संघाची प्रतिज्ञाही बाबारावांकडून लिहून घेतली. तसे तर बाबारावांनी पूर्वी अभिनव भारत आणि तरुण हिंदूसभेची प्रतिज्ञा सिद्ध केलेली होती. त्यात शाब्दिक फेरफार करून डॉ. हेडगेवार यांनी ती स्वीकृत केली. बाबा मृत्युशय्येवर असतांनादेखील जेव्हा प. पू. गोळवलकरगुरुजी बाबारावांना भेटायला गेले, तेव्हाही संघाचे काम कसे वाढेल, हाच विचार बाबांच्या मनात येत होता.

हिंदूराष्ट्रासाठी चंदनाप्रमाणे अखंड झिजलेल्या आणि शेवटी इंधनाप्रमाणे जळून गेलेल्या या कर्मयोगी, तपस्वी ऋषीला त्यांच्या ७८व्या पुण्यतिथीनिमित्त शतशः दंडवत प्रणाम..!

।। स्वातंत्र्यलक्ष्मी की जय ।।

(शब्दसंकलन : शिरीष श. पाठक, नाशिक.)

संदर्भ :-
१. आठवणी अंगाराच्या – विश्वासराव विनायकराव सावरकर
२. क्रांतिवीर बाबाराव सावरकर – द. न. गोखले

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.