राज्यातील चार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या आहेत. त्यामध्ये नाशिक, सोलापूर, बुलढाणा आणि नागपूर या चार जिल्हा बँकांचा समावेश आहे. शुक्रवारी त्याबाबतचा शासन निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केला आहे. राज्यातील १३ पेक्षा अधिक जिल्हा बँकांच्या निवडणुकांची मुदत मागच्या वर्षी संपुष्टात आलेली आहे. मात्र महात्मा फुले ज्योतिबा शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेची अंमलबजवणी करण्यासाठी प्रथम तीन महिन्यांसाठी निवडणूक पुढे ढकलल्या गेल्या. त्यानंतर कोविड १९ साथीमुळे १५ महिने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या.
बँका तोट्यात असल्यामुळे निवडणुका स्थगित
९ आॅगस्ट रोजी शासनाने ज्या बँकांची मुदत संपली आहे व ज्या बँका निवडणुकीस पात्र आहेत, अशा सर्व जिल्हा बँकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सहकारी विभागाला दिले होते. मात्र तोट्यातील बँकांच्या प्रशासकांनी निवडणुका इतक्यात न घेता बँकांचा कारभार सुधारण्यासाठी आणखी वेळ मिळावा, अशी मागणी सरकारकडे केली होती. त्यावर सरकारने निर्णय घेतला असून या चार बँकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम ७ महिन्यांच्या कालावधीसाठी पुढे ढकलला आहे. तसेच कर्जवसुली, बँकांच्या व्यवस्थापनात सुधारणा, बँक व्यवसाय वाढवणे, भांडवल पर्याप्तता वाढवणे, थकीत कर्जांचे प्रमाण कमी करणे यासाठी प्रशासकांना वेळ दिला आहे. नाशिक, नागपूर, सोलापूर व बुलढाणा या चार जिल्हा बँकांच्या निवडणुका आता ३१ मार्च २०२२ नंतर होणार आहेत.
Join Our WhatsApp Community