मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण लवकर पूर्ण होणार

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या संदर्भात सोमवारी मंत्रालयात कोकणातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक पार पाडली. या बैठकीत चौपदरीकरणासंदर्भातील कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महामार्गाच्या पनवेल ते कासु व कासु ते इंदापूर हे सुमारे ८४ किमीचे रखडलेले काम युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

राज्याच्या महाबजेटमध्येही कोकणातील विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही लवकरात लवकर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा सार्वजनिक बांधकाम मंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र चव्हाण मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

( हेही वाचा: राज्यातील कारागृह ‘हाऊस फुल्ल’; कैद्यांची संख्या दुप्पट )

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. महामार्गाचे काम १० पॅकेजेसमध्ये सुरु असून त्यापैकी ५ पॅकेजेसचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित पॅकेजेसचे कामही प्रगतीपथावर आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री रवींद्र चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबत झालेल्या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, आमदार जयंत पाटील, आमदार भरत गोगोवले, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक, आमदार शेखर निकम, आमदार प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते. तर आमदार प्रविण दरेकर, आमदार आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार निरंजन डावखरे आदि लोकप्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागचे सचिव व अन्य अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here