‘ते’ चौघे उलगडणार कुंद्राच्या पॉर्न रॅकेटचे ‘राज़’!

राज कुंद्रा हा कुठल्या प्रकारे पॉर्न व्हिडिओचे हे रॅकेट चालवत होता, याची माहिती हे कर्मचारी देणार आहेत.

89

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या अडचणी आता चांगल्याच वाढू लागल्या आहेत. शिल्पा शेट्टीचा जबाब, तिचे बँक खाते तपासले जात असतानाच, कुंद्रा याच्या कंपनीत काम करणारे चार कर्मचारी आता राज कुंद्राच्या विरोधात साक्ष देणार आहेत. राज कुंद्रा हा कुठल्या प्रकारे पॉर्न व्हिडिओचे हे रॅकेट चालवत होता, याची इत्यंभूत माहिती हे कर्मचारी देणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

गुन्हे शाखेला मिळाले पुरावे

पॉर्न व्हिडिओ प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाने राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख रॉयल थार्प या दोघांना अटक केली आहे. पॉर्न व्हिडिओ प्रकरणातील ही अकरावी अटक असून, फेब्रुवारी महिन्यात गेहना वशिष्ठसह ९ जणांना अटक करण्यात आली होती. हे नऊ जण जामिनावर सुटले आहेत. राज कुंद्रा आणि रॉयल थार्प या दोघांच्या अटकेनंतर पोलिसांच्या हाती या प्रकरणात अनेक पुरावे हाती लागले आहेत. पॉर्न व्हिडिओच्या माध्यमातून कुंद्राच्या कंपनीला मिळणारी कमाई, परदेशातून येणारे पैसे यासंदर्भात सर्व माहिती तसेच कागदोपत्री पुरावे, संगणक, लॅपटॉप, हार्ड डिस्क इत्यादी गुन्हे शाखेने गोळा केले आहे.

(हेही वाचाः राज कुंद्रा ‘असा’ फसवायचा तरुणींना? गुन्हे शाखेने सांगितली मोडस ऑपरेंडी!)

चार जण देणार साक्ष

शुक्रवारी गुन्हे शाखेने राज कुंद्रा याच्या घराची झडती घेऊन, पत्नी शिल्पा शेट्टीचे बँक खाते तपासले व तिचा जबाब नोंदवून घेतला. शिल्पा शेट्टीचा या रॅकेटमध्ये सहभाग होता का, याबाबत माहिती मिळवण्यात येत असताना, गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचा-यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. यापैकी चार कर्मचारी या प्रकरणात साक्षीदार म्हणून उभे करण्यात आले असून, या चौघांची साक्ष नोंदवण्यात येणार असल्याचे समजते. हे चारही कर्मचारी कुंद्रा चालवत असलेल्या पॉर्न व्हिडिओ रॅकेट संदर्भातील सर्व माहिती आपल्या साक्षीत नोंदवणार असल्याचे समजते. या चारही कर्मचा-यांची साक्ष न्यायालयासमोर नोंदवली जाणार असल्याचे देखील समजते.

ईडीचा प्रवेश होणार

राज कुंद्रा याने पॉर्न व्हिडिओच्या माध्यमातून केलेली कमाई, परदेशातून येणारा पैसा यासंदर्भात सक्त वसुली संचलनालय(ईडी) कडून देखील फेमा कायद्या अंतर्गत कारवाई करण्याची शक्यता आहे. लवकरच ईडी यासंदर्भात गुन्हा दाखल करुन तपास सुरू करण्याची शक्यता आहे.

(हेही वाचाः शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवला! पॉर्न व्हिडिओ प्रकरणी तपासाला गती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.