महाराष्ट्रातल्या पाणथळ जमिनीतील निवटे माशाच्या दुर्मिळ प्रजातीला मिळणार जागतिक मानांकन

333

राज्यातील पाणथळ जमिनीत आढणा-या निवटे माशांच्या अस्तित्वाचा शोध घेणा-या संशोधनात महत्त्वपूर्ण माहिती हाती लागली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस)संशोधकांना चार नव्या निवटे माशांच्या प्रजातीचा शोध लागला आहे. या चारही प्रजातील जगभगरातून पहिल्यांदाच सापडल्या असल्याचा प्राथमिक अंदाज मत्स्य शास्त्रज्ञ उन्मेष कटवटे यांनी व्यक्त केला. यासह नुकताच रामसर स्थळाचा दर्जा मिळालेल्या ठाणे खाडीत जलप्रदूषणाची समस्या गंभीर होत चालली असताना, तीन नव्या निवटे माशाच्या प्रजाती शास्त्रज्ञांना आढळून आल्या. तिन्ही नव्या प्रजाती देशभरातून केवळ ठाणे खाडीतच दिसून आल्या आहेत.

निवटे मासा

संशोधनाबाबत

निवटे माशांबाबत संशोधनाला चालना मिळण्यासाठी वनविभागाच्या कांदळवन कक्ष आणि बीएनएचएसच्या सहकार्याने दोन वर्षे  पाणथळ जागांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२१ पर्यंत हा अभ्यास करण्यात आला. ठाणे खाडी ते सिंधुदुर्ग किनारपट्टीतील पाणथळ जागांमधील निवटे माशांच्या अस्तित्वाबाबत पहिल्यांदाच मोठ्या स्तरावर अभ्यास केला गेला. त्यापैकी ४ निवटे माशांच्या दुर्मिळ प्रजातींची नोंद जगभरातून पहिल्यांदाच झाली असल्याचा अंदाज आहे. याबाबतचा तपशीलवार उलगडा होण्याबाबत संशोधन सुरु असल्याचे कटवटे म्हणाले. २१ निवटे माशांच्या प्रजाती आम्हांला आढळल्या असून त्यापैकी ९ निवटे माशांच्या प्रजाती राज्यात पहिल्यांदाच आढळल्या. तर तीन प्रजाती देशभरातून केवळ ठाणे खाडीतच आढळल्याने या भागांतील पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी हातभार लागेल, अशी आशा कटवटे यांनी व्यक्त केली. निवटे माशांच्या संशोधनाला अजून बराचसा वाव असल्याचेही कटवटे म्हणाले.

ठाणे खाडीतील तीन नव्या प्रजाती

डम्पिंग ग्राऊण्डने वेढलेल्या ठाणे खाडीत जलप्रदूषणामुळे माशांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना वाशी भागांतील गोड्या पाण्याच्या झ-यातील पाण्याच्या स्त्रोतात निवटे माशांचे अस्तित्व टिकवून ठेवत असल्याचे समजते. गोड्या पाण्याचा प्रवाह असलेल्या ठाणे खाडीतील भागांत छोटया आकाराचा डाकू निवटे मासा, काळ्या रंगाचा पण पातळ शरीरयष्टीचा असलेला छोटा बुटीफ मासा, पंख वर -खाली करत चालणारा निवटे मासा शास्त्रज्ञांना पहिल्यांदा आढळून आला आहे. यापैकी डाकू निवटे मासा इतर छोट्या माशांना आपले भक्ष्य करत असल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवले.

राज्याच्या किनारपट्टीवर पहिल्यांदा आढळलेल्या निवटे माशांच्या प्रजाती

केवळ दोन सेंटीमीटर आकाराच्या बोईट निवटे वर्गवारीत मोडणा-या दोन प्रजाती मुंबई ते सिंधुदुर्गातील पाणथळ जमिनीपर्यंत आढळल्या. या प्रजाती खारफुटींच्या मूळांमध्ये वास्तव्य करतात. दोन्ही प्रजाती केरळ किनारपट्टी आणि तामिळनाडूत आढळून आल्या आहेत.

देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील पाणथळ जमिनींत आढळून आलेल्या निवटे माशाच्या प्रजाती

हिरव्या रंगाचा निवटे, मोठ्या आकाराचा खरबा निवटे, काळ्या ठिपक्याचा निवटे, ठिपक्यावाला हिरवा निवटे, मद्रासी निवटे, प्रसिद्ध संशोधक फ्रान्सिस डेचा यांच्या नावावरून परिचयास झालेला फ्रान्सिस डेचा निवटे या पाच प्रजाती राज्यात पहिल्यांदा आढळल्या. यापैकी काही निवटे माशाच्या प्रजाती पूर्वेकडीत एक-दोन राज्यांत आढळतात.

( हेही वाचा: लव्ह जिहाद: बाईकवर भगवे झेंडे लावून आरिफ हिंदू मुलींना फसवायचा )

निवटे माशाच्या इतर प्रजाती –

पाणथळ जमिनीत एरव्ही सहज दिसणा-या मोठी निवटे, निळ्या ठिपक्यांचा निवटे, छोटी निवटे तसेच कालेटे निवटे या प्रजातीही संशोधकांना दिसल्या. निवटीसह पाणथळ जमिनीत आढळणा-या ५१ माशांच्या प्रजाती शास्त्रज्ञांना दिसल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.