उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये गुरुवारी दुपारी पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या घटनेत चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा समावेश असल्याने शोक व्यक्त केला जात आहे.

(हेही वाचा – “माफी मागावीच लागेल अन्यथा…”, दापोलीच्या रिसॉर्टबाबत भाष्य करून परबांचा सोमय्यांना इशारा)

या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. घटनास्थळी इमारतीच्या ढिगाऱ्याचा मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. ही इमारत बेकायदेशीररित्या बांधण्यात आली होती, असेही सांगितले जात आहे.

उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले की, उल्हासनगर कॅम्प 5 येथे असलेली ‘मानव टॉवर’ ही 5  मजली इमारत 25 वर्षे जुनी आहे. इमारत जीर्ण अवस्थेत होती. यामुळे ती रिकामी करण्यात आली, मात्र इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर धनवानी कुटुंबीय व इतर राहत होते. आज दुपारी चौथ्या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळला. या अपघातात धनवानी कुटुंबातील तीन जणांसह चौघांचा मृत्यू झाला. रेणू धनवानी (55), ढोलदास धनवानी (58), प्रिया धनवानी (24) आणि सागर ओचानी (19) अशी मृतांची नावे असल्याची माहिती समोर येत आहे. तर परिसरातील काही लोक ढिगाऱ्या खाली दबले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here