राज्यात वाढत्या कोरोना विषाणूमुळे विविध भागांतील रुग्णांची संख्या आता १८ हजार २६७ वर पोहोचली आहे. मात्र राज्य कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या उंबरठ्यावर नसल्याची माहिती आरोग्य विभागाचे साथरोग विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. राज्याभरात बीए.२ आणि बीए २.३८च्या उपप्रकाराचा फैलाव होत असल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
( हेही वाचा : विद्यार्थ्यांना एकदा तरी अंदमानात नेऊन वीर सावरकरांनी भोगलेल्या यातना दाखवा! पंतप्रधानांचे आवाहन)
राज्यात पहिल्यांदाच २८ मे रोजी ओमायक्रॉन विषाणूचा उपप्रकार असलेले बीए ४, बीए ५ चे प्रकार आढळून आले. यानंतर मुंबई, पुणे आणि ठाण्यात बीए व्हेरिएंटचे रुग्ण आढळले. तिन्ही शहरांत बीए ५ व्हेरिएंट प्रामुख्याने आढळून आला. पुणे आणि ठाण्यात बीए४ व्हेरिएंट सुद्धा आढळला. मात्र पुण्यातील बी जे वैद्यकीय महाविद्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वाधिक रुग्ण बीए २ या विषाणूचे सापडत आहेत. त्याखालोखाल बीए २.३८ च्या विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत.
ओमायक्रॉन विषाणूतील जनुकीय रचनेत बदल झाल्यास बीए व्हेरिएंटमध्येही छोटे मोठे बदल होत आहेत. त्यामुळेच बीए व्हेरिएंटचे उपप्रकार दिसून येत आहेत. मात्र या विषाणूत आजाराचे सौम्य स्वरुप आहे.
– डॉ. प्रदीप आवटे, सर्व्हेक्षण अधिकारी, साथरोग विभाग, आरोग्य विभाग