अरे हे काय… पोलिसाला टीसीने पकडले?

मुंबईत सीएसएमटी रेल्वे स्थानकावर विनातिकीट पकडला गेल्यावर त्याची रवानगी थेट पोलिस कोठडीतच करण्यात आली.

पोलिस अधिकाऱ्याची वर्दी घालून तो चक्क सावज शोधत असायचा, एखादे सावज जाळ्यात अडकल्यावर त्या सावजाला बोलबच्चनगिरी करुन त्याची फसवणूक करायची हा त्याचा नित्यक्रम होता. मुंबईतच नाही तर अख्या महाराष्ट्रात त्याने अनेक गरजवंतांना आपल्या जाळ्यात अडकवून फसवणूक केली होती. मात्र मुंबईत सीएसएमटी रेल्वे स्थानकावर विनातिकीट पकडला गेल्यावर त्याचे बिंग फुटले आणि त्याची रवानगी थेट पोलिस कोठडीतच करण्यात आली. सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी वर्दीसह अटक करण्यात आलेल्या भामट्याचा चौकशीत अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

पोलिसांची वर्दी तयार करुन फसवणूक

सातारा जिल्ह्यातील वडगाव हवेली येथे राहणारा निलेश सुरेश चव्हाण(२९) याला पोलिस दलात भरती व्हायचे होते. मात्र काही करणास्तव तो पोलिस दलात भरती होऊ शकला नाही. पोलिस बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही म्हणून त्याने पोलिस बनण्याची हौस पूर्ण करण्यासाठी, त्याने कोल्हापूर येथील पोलिसलाईन याठिकाणी असलेल्या महेश टेलरकडे पोलिस उपनिरीक्षकाचा गणवेश शिवून घेतला होता. त्यानंतर त्याने निलेश सुरेश चव्हाण पोलिस उपनिरीक्षक अशी नेमप्लेट असलेला ड्रेस, लाल रंगाचा बेल्ट त्यावर म.पो. सिम्बल, त्यावर दोन म.पो.आणि स्टार, लाईनयार्ड असे विकत घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची वर्दी तयार करुन घेतली.

(हेही वाचाः अंबानी प्रकरण : तिहार जेल कनेक्शन, इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याचा मोबाईल जप्त!)

मिरवायचा रुबाब

पोलिस अधिकारी यांची वर्दी घालून तो राज्यातील जिल्ह्यामध्ये ऐटीत फिरू लागला होता. साहेब कुठले पोलिस ठाणे? असे कोणी विचारल्यावर जवळच्या पोलिस ठाण्याचे नाव सांगून नवीनच बदली होऊन आलो असे तो सांगायचा. त्याची वर्दी बघून कुणालाही तो पोलिसच वाटायचा. पोलिसांची वर्दी घालून तो कुठल्याही दुकानात जायचा फुकट वस्तू घ्यायचा, रिक्षा- बसने फुकट प्रवास करायचा, लोक त्याला आदराने दंडवत घालायचे, हे सर्व अनुभवताना त्याला खूप मज्जा यायची. मात्र पैसे कसे मिळवता येतील म्हणून त्याने पोलिस वर्दीचा फायदा घेत ओळखीच्या लोकांना गंडा घालण्यास सुरुवात केली. कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये त्याने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्यानंतर त्याने मुंबई गाठली होती.

विनातिकीट फिरत होता आणि…

काही दिवसांपूर्वी तो मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(सीएसएमटी) रेल्वे स्थानकावर पोलिस उपनिरीक्षकाच्या वर्दीत आपले सावज हेरत फिरत असताना, अचानक रेल्वेचे मुख्य टीसी राजेश करलकर यांनी त्याला तिकीट विचारले. वर्दीत असून देखील आपल्याला तिकीट विचारल्यामुळे तो थोडासा गोंधळला आणि तिकीट, रेल्वे पास नसल्यचे त्याने टीसी करलकर यांना सांगितले. करलकर यांनी साहेब तुमचे ओळखपत्र दाखवा, असे विचारले असता तो आणखीनच गोंधळला. त्याची ती अवस्था बघून हा बोगस पोलिस असावा असा संशय येताच टीसी करलकर जवळच असलेल्या सीएसएमटी पोलिस ठाण्यात त्याला घेऊन आले.

(हेही वाचाः सुओ मोटो म्हणजे नेमकं काय?)

गुन्हा दाखल करुन अटक

पोलिस आल्यानंतर नक्की कोणी कोणाला पकडून आणले याबाबत पोलिस ठाण्यात थोडा गोंधळ उडाला. मात्र टीसी कारलकर यांनी पोलिसांना आपली ओळख दाखवून संपूर्ण प्रकार ठाणे अंमलदारांना समजावून सांगितला. पोलिसांनी अधिकाऱ्याच्या वर्दीत असलेल्याकडे चौकशी केली असता, त्याची बनावटगिरी सर्वांसमोर आली. सीएसएमटी पोलिसांनी निलेश चव्हाण यांच्या अंगावरील वर्दी उतरवून ताब्यात घेतली व त्याला साधे कपडे घालण्यास दिले. त्याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. निलेश चव्हाण हा मागील काही महिन्यांपासून पोलिसाचे कपडे घालून लोकांची फसवणूक करत होता, त्याच्यावर राज्यातील अनेक जिल्ह्यांत फसवणुकीचे गुन्हे असल्याची माहिती सीएसटीएम पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ए.सी. शेख यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here