‘पोलीस आयुक्त कार्यालयातून बोलत आहे, तुम्ही सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे तुम्हाला अटक करण्यासाठी तुमच्या घरी पोलीस येत आहेत. तुम्ही ऑनलाईन जामिनाची रक्कम भरून अटक टाळू शकता’, असे सांगून सायबर गुन्हेगारांचा नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचा नवीन फंडा समोर आला आहे. मुंबईतील वांद्रे आणि कांदिवली येथे राहणाऱ्या दोघांना अशा प्रकारे फोन आले होते. याप्रकरणी मुंबईच्या सायबर पोलिसांनी त्यांची दखल घेतली असून नागरिकांनी असे कॉल आल्यास घाबरून न जाता तसेच कुठलेही आर्थिक व्यवहार न करता थेट नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
कसे येतात कॉल?
- नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून नवनवीन क्लुप्त्या वापरल्या जात आहेत. मध्यंतरी या सायबर गुन्हेगारांनी महावितरण अधिकारी, वीज कंपनीच्या नावाने लोकांना ‘तुमचे वीज बिल भरलेले नाही, तुमचा वीजपुरवठा आजच खंडित करण्यात येणार आहे, त्यासाठी तुम्ही संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा’ असा मेसेज पाठवण्यात येतो. सोबत एक मोबाईल क्रमांक देण्यात येत होता. अनेक जण या मेसेजला बळी पडले आणि त्यांची आर्थिक फसवणूक झाली असल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या असतांना लोकांना लूटण्याची नवीन पद्धत सायबर गुन्हेगारांनी शोधून काढली आहे.
- वांद्रे येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला काही दिवसांपूर्वी एक कॉल आला होता, ‘आम्ही सिपी (आयुक्त कार्यालय) बोलत आहोत, तुमच्या नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे, त्याला जेलमध्ये पाठविण्यात आले असून त्याच्या सुटकेसाठी २१ हजार ऑनलाइन पेमेंट करा’ असे सांगण्यात आले. घाबरलेल्या व्यक्तीने फोन बंद करून नातेवाईकाला फोन केला असता तो घरीच होता, काही वेळाने त्या व्यक्तीच्या व्हाट्सअँप वर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे सहपोलीस आयुक्त यांचा फोटो पाठवण्यात आला व पुढच्या १० मिनिटांनी कॉल करून पैशांची व्यवस्था झाली का? असे विचारण्यात आले. हा कॉल फसवणुकीचा असल्याचे लक्षात येताच त्याने कॉल बंद करून वांद्रे पोलिसांकडे संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला.
(हेही वाचा उद्धव ठाकरेंचे नाराज आमदारांना आवाहन ‘एकत्र बसून मार्ग काढू!’! वाचा पत्र जसेच्या तसे…)
- दुसऱ्या घटनेत कांदिवलीतील एका व्यक्तीला असाच कॉल आला व तुमचा आक्षेपार्ह व्हिडीओ युट्युब वर अपलोड झाला आहे, हा गुन्हा असून तुम्हाला अटक करण्यासाठी तुमच्या घरी येत आहे असे सांगण्यात आले. मात्र त्याने मी कुठलाही व्हिडीओ अपलोड केलेला नाही असे सांगितले असता तुम्हाला अटक करून ६ महिने तुरुंगात ठेवण्यात येईल अटक टाळण्यासाठी ऑनलाइन दंड भरा असे सांगण्यात आले. घाबरलेल्या तरुणाने फोन कट करून पोलिसांच्या १०० क्रमांकावर कॉल करून तक्रार केली, ही तक्रार पुढील तपासासाठी कांदिवली पोलिसांकडे पाठविण्यात आली आहे.
सतर्क रहा
जर एखादा कॉल करणारा तुम्हाला सांगत असेल की, तो मुंबई सीपी ऑफिसचा अधिकारी आहे आणि ते तुम्हाला अटक करणार आहेत, तर तुम्ही त्यांचा संपर्क क्रमांक आणि ऑफिसचा पत्ता विचारा. त्यानंतर मग तुम्ही स्थानिक पोलीस ठाण्याला फोन करून नंबरची पडताळणी करा. पोलीस तुम्हाला फोनवर कधीच सांगणार नाहीत की ते तुम्हाला अटक करतील, ते तुम्हाला प्रथम निवासस्थानी नोटीस पाठवतील. पोलिसांकडून कधीही ओटीपी क्रमांक विचारला जात नाही किंवा जामिनासाठी ऑनलाईन पेमेंटची कुठलीही तरतूद नाही, लोकांनी सावध राहावे आणि अशी भीती बाळगू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेले आहे.
Join Our WhatsApp Community