नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा मोतीबिंदू मुक्त करण्याचे ध्येय!

220

रोटरी क्लब ऑफ मुंबई, वर्धा, नागपूर दक्षिण पूर्व, पोलिस विभाग, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माऊली मित्र सेवा मंडळ यांच्या वतीने, दत्ता मेघे यांच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी येथे नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा मोतीबिंदू मुक्त करण्याचे ध्येय यानिमित्ताने ठरवण्यात आले आहे.

नक्षलग्रस्त भागातील गरजू लोकांना मदत

गडचिरोली नक्षलग्रस्त भागात अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नक्षल भागातील गरजू नागरिकांची मोतीबिंदू शिबिरासाठी आधारकार्ड तपासणी करत या लोकांना घेऊन, विभागीय पोलिसांनी जवळपास ६ तास प्रवास केला, असे ७४९ गरजू लोक एकत्रित आले. या लोकांच्या डोळ्यांची सुरक्षित जागेत पोलिसांच्या देखरेखीखाली ४ डॉक्टरांनी तपासणी केली. यातील ३२० लोकांना मोतीबिंदूचे निदान झाले. २५० नागरिकांना चष्माचे वाटप केले, तर ज्या उर्वरित लोकांना काहीच त्रास नव्हता, त्या काही लोकांच्या डोळ्यांची तपासणी करत औषध दिले. पहिल्या टप्प्यात ५० रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आणि लवकरच दुसऱ्या टप्यात उर्वरित रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आयोजित केली जाणार आहे.

Eye

मोतीबिंदू मुक्त

गडचिरोली जिल्हा हा पूर्णपणे मोतीबिंदू मुक्त व्हावा हे पोलिस विभागाचे उद्दिष्ट आहे, असे सुहास खरे यांनी स्पष्ट केले आहे. नेत्ररोग, नियमित नेत्रतपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया याविषयी जागरूकता पसरवून ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचणे. तसेच दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध नसणे, आव्हानांना तोंड देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. मोतीबिंदूमुळे होणाऱ्या अंधत्वाचे जागतिक ओझे दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत, अनावश्यक अंधत्व दूर करणे हे ध्येय आहे. गडचिरोली पोलिस विभाग आणि अहेरीच्या कर्मचाऱ्यांनी नेत्र तपासणी शिबिरात सर्व व्यवस्था केली, तसेच हा नक्षलग्रस्त विभाग असल्यामुळे अहेरी ते सावंगी मेघे रूग्णालय हा प्रवास पूर्णपणे पोलिसांच्या सुरक्षेत होतो, असेही खरे यांनी स्पष्ट केले.

( हेही वाचा : येत्या नवीन आर्थिक वर्षात पी- उत्तर विभागाचे विभाजन! )

ब्रिज चांडक, संजीव उपगडे, विक्रम बुटी, राजन ठावकार, प्रशांत सांबे, ज्योत्स्ना बाजारे, कल्पना चिमोटे, दीपक ठाकरे, दीपक ठाकरे, गिरीश मेहता, दिनेश कवाडे, रवींद्र येडलवार यांनी 200 चष्मा प्रायोजित केले. राजे संग्रामसिंह भोसले, संजीव उपगडे, कल्पनाराजे भोसले, साईराजे भोंसले, महेश अंधारे, रुपेश सचदेवा व माऊली मित्र सेवा मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. राजीव वरभे यांनी खाद्यपदार्थांची पाकिटे, मिठाई, नमकीन यांची विशेष व्यवस्था केली. तसेच रुग्ण व त्यांची काळजी घेणाऱ्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. राजे संग्रामसिंह भोसले यांनी डोळ्यांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान एका रुग्णाचे तातडीचे ऑपरेशन प्रायोजित केले. वैद्यकीय संचालक राजीव वारभे, अध्यक्ष सुहास खरे, अध्यक्ष रत्नाकर चिमोटे, विजय बाजारे मानद सचिव, राजे रघुवीरसिंग भोंसले यांच्या अथक परिश्रमाने हा प्रकल्प सुनियोजित व उत्तम प्रकारे झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.