सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील मुख्य आरोपीपैकी दीपक टिनू यांच्या मैत्रिणीला मुंबईच्या विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी रविवारी ही कारवाई केली असून ती मुंबईहून मालदीव येथे पळून जाण्याचा प्रयत्नात असताना ही कारवाई करण्यात आली आहे.
काही आठवड्यापूर्वी दीपक टिनू हा पोलिसांच्या ताब्यात असताना पळून गेला होता, त्याला आश्रय देणे व पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून त्याच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस टिनूच्या मैत्रिणीची चौकशी करून फरार टिनूला पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत.
(हेही वाचा – धनुष्यबाण गोठवल्यानंतर ठाकरेंवर अमृता फडणवीसांचा निशाणा, दिले ‘हे’ ४ खोचक पर्याय)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने दीपकला मानसा येथून गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयए) ताब्यातून पळून जाण्यास मदत केली होती. दीपक टिनू हा तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार आणि पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येतील मुख्य आरोपींपैकी एक आहे. टिनू हा गेल्या आठवड्यात मानसा जिल्ह्यातून पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता. त्याला पळून जाण्यास त्याच्या मैत्रिणीने मदत केली होती व ती रविवारी मुंबईतून मालदिव येथे विमानाने जाणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पंजाब पोलिसांचे पथक रविवारी मुंबईत दाखल झाले व त्यांनी तिला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेऊन अटक केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची २९ मे रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community