महाराष्ट्राच्या जेष्ठ समाजसेविका तसेच पद्मश्रीच्या मानकरी सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी पुण्याच्या ठोसर पागा येथे महानुभाव पंथानुसार दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांना शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. सिंधुताई यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी केअर हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. तेव्हापासून त्या मागच्या महिन्याभरापासून हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या.
अनाथांची माय
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला होता. त्यांनी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावात ममता बालसदन या संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेच्या माध्यमातून त्या अनाथ मुलांना सांभाळत असत. या संस्थेत मुलांना सर्व प्रकारचे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यात येते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील आणि ते स्वतःच्या पायावर खंबीरपणे कशी उभी राहतील, यासाठी त्यांचे प्रयत्न असायचे. सिंधुताई सपकाळ यांनी त्यांच्या जीवनात अनाथ व बेवारस मुलांना आधार देण्याचे फार मोठे काम आयुष्यभर केले आहे.
( हेही वाचा: माझ्यावर होणा-या टीकेला शांत घेतोय, पण…! मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा )
पद्मश्री सिंधुताई
आतापर्यंत हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत, या मुलांची म्हणजेच अनाथांची माय अशी त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. महिलांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे कामही त्यांनी आयुष्यभर केले. त्यांना आतापर्यंत संस्था, संघटना आणि राज्य व केंद्र सरकारच्यावतीने विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री या पुरस्कारानेही सन्मानित केले आहे.
Join Our WhatsApp Community