शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला आज सोमवारपासून सुरूवात झाली आहे. आजपासून अर्जाचा भाग १ विद्यार्थ्यांना भरता येणार असून, केवळ केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्यांसाठी ही ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे. राज्यभरात अन्य ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शुल्क आणि अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शक केंद्र निवडायचं आहे. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी आपला पसंती क्रमांक देऊन अर्जाचा भाग २ भरायचा आहे. मात्र अर्जाचा भाग १ कसा भरायचा जाणून घ्या…
(हेही वाचा – राज ठाकरेंवर लिलावतीत ‘या’ तारखेला होणार शस्त्रक्रिया)
असा भाग १ चा अर्ज
- https://11thadmission.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करा
- नोंदणी झाल्यानंतर लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करा
- त्यानंतर लॉगिन करून इयत्ता 11वी प्रवेशासाठीच्या अर्जाचा भाग 1 भरा
- ऑनलाईन शुल्क भरून फॉर्म लॉक करा
- अर्ज प्रमाणित करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्र निवडावे लागेल
- मार्गदर्शन केंद्र किंवा माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी आपला अर्ज प्रमाणित करून घ्यायचा आहे.
इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला नसला तरी विद्यार्थी व पालकांनी अकरावी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरावा, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागातर्फे गेल्या काही वर्षांपासून इयत्ता अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. दरवर्षी सुमारे एक लाखाहून अधिक विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी करतात त्यातील सुमारे ७० ते ७५ हजार विद्यार्थी प्रत्यक्षात ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेतात.
सोमवारपासून प्रवेश अर्जाचा पहिला भाग विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करून ऑनलाईन अर्जात अचूक वैयक्तिक माहिती भरावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे आणि त्यांनी भरलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या पसंतीक्रमानुसार प्रवेश दिले जातात. ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याचा विद्यार्थ्यांना सराव करता यावा, यासाठी शिक्षण विभागाने २३ ते २७ मे या कालावधीत लिंक ओपन करून दिली होती, मात्र फार कमी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला.
Join Our WhatsApp Community