बारावीची बोर्डाची परीक्षा सध्या सुरु आहे. बारावीचा पेपर फुटल्याचा नुकताच प्रकार घडल्यानंतर आता अजून एक धक्कादायक प्रकार गडचिरोली येथून समोर आला आहे.
केंद्र प्रमुखाने बारावीच्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या घरी बोलावून काॅपी करण्यासाठी प्रत्येकी 500 रुपये घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता या घटनेची प्रशासनाने दखल घेतली आहे. याप्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीवरुन आरोपी प्राध्यापक किशोर कोल्हे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रप्रमुखाने बारावीच्या परीक्षेत काॅपी करु देण्यासाठी सहा विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 500 रुपये घेतले होते. यातीलच एका विद्यार्थ्याने प्राध्यापकाला पैसे देतानाचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. याप्रकरणी आता आरोपी प्राध्यापक किशोर कोल्हे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
( हेही वाचा: मोठी बातमी! हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड )
आरोपी शिक्षकाला केंद्रप्रमुख पदावरुन हटवले
पैसे देणा-या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षागृहात काॅपी करु देण्याची मुभा देण्याचा प्रकार धक्कादायक आहे. बोर्डाचे भरारी पथक येण्याआधी तातडीने सूचना देण्याचीही माहिती या व्हिडीओत सांगितली जात आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गडचिरोलीच्या शिक्षण विभागाचे आरोपी शिक्षक किशोर कोल्हे यांना केंद्रप्रमुख पदावरुन हटवले आहे. या संपूर्ण व्हायरल व्हिडीओची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी राजेंद्र निकम यांनी दिले होते. आता तहसिलदारांनी दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community