नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरलेली स्फोटके गडचिरोली पोलिसांकडून हस्तगत

121

गडचिरोली पोलिसांनी मंगळवारी ११ ऑक्टोबर रोजी कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या पोमके मालेवाड परिसरातील हेटळकसा जंगलात नक्षलवाद्यांनी जमिनीखाली पुरुन ठेवलेली स्फोटके आणि दारूगोळा हस्तगत करून नष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटकं जगंल परिसरात जमिनीमध्ये पुरुन ठेवतात. अशा पुरुन ठेवलेल्या साहित्यांच्या वापर नक्षलवाद्यांकडून घातपाती कारवायांसाठी केला जातो. हाच पुरलेला साहित्याचा साठा गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

(हेही वाचा – आता एलॉन मस्क परफ्यूम विकणार? काय आहे कारण? नाव अन् किंमत ऐकून…)

गडचिरोली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मंगळवारी दुपारी १२ वाजता कुरखेडा उपविभागातील हेटळकसा जंगलात सर्ज ऑपरेशन राबवले. यावेळी नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली स्फोटके, दारूगोळा आढळून आला. यामध्ये २ नग जिवंत कुकर, २ नग क्लेमोर, १ पिस्टल, २ नग वायर बंडल व पाणी साठवण्याचा १ नग जर्मन गंज इत्यादी साहित्याचा समावेश आहे. ही सर्व स्फोटके बीडीएसच्या मदतीने घटनास्थळीच नष्ट करण्यात आलीत. उर्वरित साहित्य जप्त करून गडचिरोली येथे नेण्यात आले.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथक गडचिरोली व बीडीडीएस पथकाच्या जवानांचे पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे. तसेच जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचे सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.