‘अंतिम जन’ नियतकालिकावरून निरर्थक वाद

हिंदुस्तानच्या केंद्रीय सरकारच्या अखत्यारीत असलेली गांधी स्मृती आणि दर्शन समिती या नावाची एक संस्था आहे. या संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय गोयल आहेत. या संस्थेच्या वतीने अंतिम जन नावाचे एक नियतकालिक प्रकाशित होते. ही संस्था आणि हे नियतकालिक गांधींना समर्पित करण्यात आले आहे. अशा या गांधी समर्पित नियतकालिकाच्या ताज्या अंकात एकूण पंधरा लेख प्रकाशित झाले आहेत.‌ त्यातील बारा लेख स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिले गेले आहेत.‌ तीन लेख मोहनदास करमचंद गांधी यांच्यावर लिहिले गेले आहेत.

सावरकरांनी निवडलेला मार्ग सशस्त्र क्रांतीचा

या नियतकालिकाच्या संपादकीय लेखात विजय गोयल यांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात जेवढे महात्मा गांधींचे योगदान आहे तेवढेच योगदान स्वातंत्र्यवीर सावरकरांचेही आहे असे म्हटले आहे. म्हणजे यात गांधीजींचा कोठेही अपमान करण्यात आलेला नाही असे असतानाही वाद निर्माण झाला आहे. वास्तविक यात वाद निर्माण होण्याचे कारण नाही. महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी निवडलेला मार्ग सत्य, अहिंसा या तत्त्वांवर आधारित होता. सावरकरांनी निवडलेला मार्ग सशस्त्र क्रांतीचा होता.

हिंदू मुसलमानांमध्ये एकोपा निर्माण व्हावा यासाठी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर हिंदूंनी हिंदू म्हणून जी राजकीय भूमिका घेतली होती ती सोडून त्यांनी हिंदी व्हावे असे ठरले. त्याप्रमाणे हिंदू राजकीय दृष्ट्या हिंदी झाले. तशीच भूमिका मुसलमानांनी त्यांची मुसलमान ही राजकीय भूमिका सोडून राष्ट्राच्या हितासाठी हिंदी होणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही.‌ राजकीय दृष्ट्या हिंदू हिंदी झाले पण मुसलमान हिंदी न होता मुसलमानच राहिले.‌ ही गोष्ट महात्मा गांधींनी ध्यानात घेतली नाही. सावरकरांनी ती ध्यानात घेतली.‌ महात्मा गांधी हिंदू मुसलमान ऐक्याचे स्वप्न पाहत होते. भविष्यात कधीतरी हिंदू आणि मुसलमान यांचे ऐक्य होईल अशी शक्यता महात्मा गांधींना वाटत होती.

सावरकरांच्या दृष्टीने हिंदू मुसलमान ऐक्य हे मृगजळ

सावरकरांच्या दृष्टीने हिंदू मुसलमान ऐक्य हे मृगजळ आहे. भविष्यात कधी हिंदू आणि मुसलमान ऐक्य घडून येईल अशी शक्यता सावरकरांना वाटत नव्हती. म्हणून सावरकरांनी हिंदू कोण याची व्याख्या केली. हिंदूंच्या मनात असलेली भूमीनिष्ठा मुसलमानांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे सावरकरांनी निदर्शनाला आणून दिले. पण त्याकडे काँग्रेस वासियांनी दुर्लक्ष केले. परिणामी फाळणी झाली. महात्मा गांधींनी फाळणी स्वीकारली यामागचे कारण म्हणजे मुसलमानांची मागणी पूर्ण केली नाही तर हिंदू मुसलमानांमध्ये होणारे दंगे आपल्याला अडवता येणार नाहीत. या यादवीला सामोरे जाण्याऐवजी आपण विभाजनाचा पर्याय निवडावा अशी गांधींची भूमिका होती. सत्य, अहिंसा या त्यांच्या तत्त्वाशी जवळीक साधणारी त्यांची भूमिका होती. सहिष्णुता हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्राण होता.

सावरकर सशस्त्र क्रांतिकारक

सावरकरांची भूमिका गांधींच्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. सावरकर सशस्त्र क्रांतिकारक होते. यादवीला सामोरे जाण्यास ते सिद्ध होते. शस्त्रबळावर अतिरेकी मनोवृत्ती नष्ट करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. त्यावर त्यांचा विश्वासही होता. त्याचबरोबर सहिष्णुता ही श्रेष्ठ असली तरी जयिष्णूतेचा बळी देऊन सहिष्णुतेला गोंजारत बसणे सावरकरांच्या तत्त्वात बसत नव्हते. सावरकरांना हिंदूंच्या सहिष्णू धर्माचे जयिष्णू धर्मात परिवर्तन घडवून आणायचे होते. गांधींची आणि सावरकरांची राजकीय भूमिका अशी परस्परविरुद्ध होती. शांतपणे विचार केल्यावर सावरकरांची भूमिका शतप्रतिशत योग्य असल्याचे आज आपल्या निदर्शनाला येते. सांप्रतकाळात आपल्या देशात घडणाऱ्या घटनांकडे पाहिल्यास आपल्या लक्षात येते की मुसलमान वर्ष २०४७ पर्यंत या देशाचे इस्लामिक राष्ट्रात रूपांतर करण्यासाठी कार्यरत झाले आहेत. तसा प्रयत्न करणाऱ्यांपैकी काही जणांना नुकतीच अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा – …आणि कदमांना अश्रू अनावर, म्हणाले “50 वर्षात जे उभारलं ते पत्त्यांच्या पानाप्रमाणे कोसळलं”)

महात्मा गांधींची राजकीय भूमिका ही आज चुकीची असल्याचे सिद्ध होत आहे. हे वास्तव स्वीकारून सावरकरांची राजकीय भूमिका रास्त होती हे स्वीकारण्याची मानसिकता आपल्याला आढळून येत नाही. त्याऐवजी सावरकरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात येते आणि गांधीजींच्या चुकलेल्या राजकीय भूमीके वर पडदा घालण्याचा प्रयत्न केला जातो. असे म्हटल्यावर कोणी डोक्यात राख घालून घेऊ नये. कारण यात व्यक्ती म्हणून कोणावरही टीका करण्यात आलेली नाही तर त्या व्यक्तीने स्वीकार केलेल्या धोरणावर टीका करण्यात आलेली आहे. डोके राखून याचा विचार करावा आणि सांप्रत काळातील देशातील परिस्थितीचा धांडोळा घ्यावा एवढीच माफक अपेक्षा. हा समंजसपणा निर्माण झाला तर अशा प्रकारचे निरर्थक वाद भविष्यात घातले जाणार नाहीत.

दुर्गेश जयवंत परुळकर, व्याख्याते आणि लेखक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here