यंदा गणेश दर्शन ऑनलाईनच! नवस फेडू इच्छिणाऱ्या गणेशभक्तांचे काय? 

लालबाग, गणेशगल्ली, चिंतामणी अशा मुंबईतील अनेक प्रसिद्ध गणेश मंडळांना यंदाही गणेशभक्तांचा गणेश दर्शनाचा हट्ट पुरवता येणार नाही.

107

कालपर्यंत राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना शक्य असेल, तर ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करावी, असे निर्देश दिले होते, मात्र त्यामध्ये आता सुधारणा करत सरसकट सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशभक्तांना थेट मंडपात येऊन श्रींचे दर्शन घेण्यास प्रतिबंध केला आहे. त्याऐवजी ऑनलाईन पद्धतीने दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे सुधारित परिपत्रक काढले आहे. त्यामुळे १० सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात लालबाग, गणेशगल्ली, चिंतामणी अशा मुंबईतील अनेक प्रसिद्ध गणेश मंडळांना यंदाही गणेशभक्तांचा गणेश दर्शनाचा हट्ट पुरवता येणार नाही.

नवस फेडायला येणाऱ्या गणेशभक्तांची अडचण होणार! 

मागील वर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोस्तव मंडळाने कोरोनाच्या संसर्गामुळे गणेशमूर्तीची स्थापना केली नव्हती, मात्र दुसऱ्या वर्षी सरकारच्या नियमांच्या अधीन राहून किमान ४ फुटांची मूर्ती तरी स्थापन करावी, जेणेकरून भक्तांना त्यांचे नवस फेडणे शक्य होईल, अशी मागणी गणेशभक्तांकडून होऊ लागली, त्यामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशमूर्तीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला, मात्र आता गणेशभक्तांना प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नसल्याने नवस फेडायला येणाऱ्या गणेशभक्तांची अडचण होणार आहे.

(हेही वाचा : बाप्पाच्या स्वागतासाठी चाकरमानी कोकणाकडे रवाना)

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ मार्गदर्शक सूचना

  • कोविड – 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.
  • सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
  • मंडपाबाबतच्या धोरणानुसार मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित आहे.
  • श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपतीकरिता २ फुटांच्या मर्यादेत असावी.
  • या वर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.
  • उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबीरे (उदा.  रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच जनजागृती करण्यात यावी.)
  • श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केवल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
  • श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ रहावी.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.