Ganesh Utsav 2024 : गणपतीची मातीचीच मूर्ती का असावी?

'इको फ्रेंडली गणेशोत्सव’ हे शब्द तुम्ही ऐकलेच असतील. आपण गणेशोत्सव साजरा करीत असताना पर्यावरणास बाधा येईल अशा वस्तूंचा उपयोग टाळायचा. मातीचीच छोटी मूर्ती, प्लॅस्टिक-थर्मोकोलचा वापर न करता केलेली सजावट, ध्वनिवर्धकाचा संयमाने वापर आणि गणेशमूर्तीचे विसर्जन हे जलप्रदूषण होणार नाही अशा पद्धतीनेच करायचे. यालाच ‘इकोफ्रेंडली गणेशोत्सव’ म्हणतात.

257
  • दा. कृ. सोमण

यावर्षी शनिवार, ७ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. गणेश हा चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती आहे. श्रीगणेशाचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी आपण श्रीगणेशपूजा करीत असतो. गणेशाची पूजा भीतीने करू नका. गणपती हा कुणाचे वाईट करीत नसतो. तो सुखकर्ता आहे, तो दु:खहर्ता आहे. गणेशपूजनाने आपल्यात चांगला बदल व्हायला पाहिजे. (Ganesh Utsav 2024)

श्रीगणेशपूजेची प्रथा कधी सुरू झाली, या विषयी विद्वानांत मतभेद आहेत. डॉ. रामकृष्ण भांडारकरांच्या मते गणेशपूजा पाचव्या ते आठव्या शतकात सुरू झाली असावी. परंतू काही पंडितांच्या मते श्रीगणपती अथर्वशीर्ष इतके जुने आहे, त्याअर्थी गणेशपूजा साडेतीन हजार वर्षांपूर्वी वैदिक काळीही प्रचलित असावी. भारताप्रमाणेच नेपाळ, तिबेट, ब्रह्मदेश, थायलंड, इंडोचायना, चम्पा, जावा, बाली, बोर्निओ, श्रीलंका, चीन, तुर्कस्थान, जपान आणि मेक्सिको येथेही प्राचीन गणेशमंदिरे आहेत.

प्राचीनकाळचे गणेश विषयक माहिती असलेले श्रीगणेशपुराण आणि श्रीमुद्गलपुराण हे ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. भाद्रपद शुक्ल चतुर्थी मध्यान्हकालव्यापिनी असेल तर तो दिवस श्रीगणेश चतुर्थीचा मानावा असे शास्त्रात सांगितलेले आहे. मध्यान्हकाल म्हणजे कोणता तेही सांगतो. दिनमानाचे पाच समान भाग करावे. पहिला प्रात:काळ, दुसरा संगवकाळ, तिसरा मध्यान्हकाल, चौथा अपराण्हकाल आणि पाचवा सायंकाळ मानला जातो. दोन्ही दिवशी संपूर्ण, अथवा कमी-जास्त मध्यान्हकालव्यापिनी असेल किंवा दोन्ही दिवशी मध्यान्हकालव्यापिनी नसेल तर पूर्व दिवशीची घ्यावी असेही शास्त्रात सांगण्यात आले आहे. (Ganesh Utsav 2024)

मातीचीच मूर्ती का?

वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर श्रीगणेश चतुर्थीबद्दल सांगायचे असेल तर भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्यामुळे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला मातीच्या-पार्थिव गणेशमूर्तीचे पूजन करून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. नंतर पितृपक्ष येतो. त्यावेळी आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यानंतर आश्विन महिना येतो. त्या महिन्यात शेतात तयार झालेले धान्य घरात येत असते. पृथ्वीच्या निर्मिती शक्तीमुळे हे धान्य तयार होत असते. म्हणून आश्विनातील नवरात्रात निर्मितीशक्तीची पूजा केली जाते. निर्मितीशक्ती हीच आदिशक्ती आहे. त्यानंतर दसरा, दिवाळी इत्यादी सण येत असतात. भारत हा शेतीप्रधान देश असल्यानेच शेतीवर व ऋतूंवर आधारित अशी सणांची रचना केलेली आहे. (Ganesh Utsav 2024)

(हेही वाचा Ganesh Chaturthi 2024 : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी; सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय)

आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार या सोळा उपचारांनी केलेल्या पूजेला ‘षोडशोपचार पूजा’ असे म्हणतात. घराघरात श्रीगणेशमूर्तीची स्थापना करून गणेश चतुर्थीला तिची पूजा केली जाते. प्राणप्रतिष्ठा मंत्राने मूर्तीमध्ये देवत्त्व आणले जाते. दीड, पाच, गौरींबरोबर सात किंवा दहा दिवस गणेशमूर्तीचे पूजन केले जाते. विसर्जनाच्या दिवशी उत्तरपूजेच्या मंत्रांनी मूर्तीमधील देवत्त्व काढून घेऊन गणेशमूर्तीचे पाण्यामध्ये विसर्जन केले जाते.

घरगुती गणेशोत्वाच्या निमित्ताने घराची स्वच्छता केली जाते. श्रीगणेशाचे दर्शन घेण्यासाठी आप्तेष्ट, मित्रमंडळी एकत्र येत असतात. सर्वजण दु:ख, चिंता, काळजी विसरून गणेशोत्सवात सामील होत असतात. श्रीगणेश हा सुखकर्ता आहे, तो दु:खहर्ता आहे. तो विघ्नांचे निवारण करणारा आहे. तो बुद्धिदाता आहे अशी उपासकांची श्रद्धा असते. हा उत्सव घराघरात आनंद निर्माण करून जातो. हा आनंद पुढच्या गणेश चतुर्थीपर्यंत भाविकांना सुखी ठेवत असतो.

आधुनिक काळातील उत्सव

आधुनिक काळातील घरगुती गणेशोत्सवाबद्दल सांगायचे म्हणजे लोकसंख्या वाढल्याने घरगुती गणेशोत्सवांची संख्याही वाढली आहे. तसेच पूर्वींपेक्षा माणसांची आर्थिक क्षमताही वाढली आहे. गणेश दैवताची लोकप्रियताही वाढली आहे. लोक घरगुती गणेशोत्सवावरही जास्त खर्च करू लागले आहेत. लोक धार्मिकतेपेक्षा सांस्कृतिक गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत. वाढती असुरक्षितता, प्रत्येक क्षेत्रामध्ये जीवघेणी स्पर्धा, कमी श्रमात मोठे यश मिळविण्याची इच्छा यामुळे माणसांचा स्वकर्तृत्वापेक्षा दैवावर जास्त विश्वास बसू लागला आहे.

घरगुती गणेशोत्सवांची संख्या वाढल्याने पर्यावरणासंबंधीचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. गणेशोत्सवामुळे जलप्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात येऊ लागले आहेत. लोकांचा त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. निर्माल्य कलश ठेवून त्या निर्माल्याचा उपयोग खत निर्मितीसाठी करण्यात येऊ लागला आहे.

‘इको फ्रेंडली गणेशोत्सव’ हे शब्द तुम्ही ऐकलेच असतील. आपण गणेशोत्सव साजरा करीत असताना पर्यावरणास बाधा येईल अशा वस्तूंचा उपयोग टाळायचा. मातीचीच छोटी मूर्ती, प्लॅस्टिक-थर्मोकोलचा वापर न करता केलेली सजावट, ध्वनिवर्धकाचा संयमाने वापर आणि गणेशमूर्तीचे विसर्जन हे जलप्रदूषण होणार नाही अशा पद्धतीनेच करायचे. यालाच ‘इकोफ्रेंडली गणेशोत्सव’ म्हणतात. (Ganesh Utsav 2024)

गणेशमूर्तीचे पाण्यात विसर्जन करीत असताना गणेशभक्त ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ असा निरोप बाप्पाला देत असतात. त्याला लवकर येण्याची विनवणी करीत असतात. भक्तांच्या विनंतीला मान देऊन गणपती बाप्पा पुढच्या वर्षी ११ दिवस लवकर म्हणजे बुधवार २७ ॲागस्ट २०२५ रोजी येणार आहे.

(लेखक पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक आहेत.)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.