गणेश चतुर्थीला बाप्पांचं आगमन झाल्यानंतर पाच दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर आज पाच दिवसांच्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. चौपाटी आणि कृत्रिम तलाव येथे विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून विसर्जनासठी होणारी गर्दी लक्षात घेता मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर सुरक्षेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
(हेही वाचा – PMPML च्या २५० फेऱ्या रद्द; सव्वादोन लाख पुणेकरांना फटका)
मुंबईतील समुद्र किनारे आणि तलावांच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना मुंबई महापालिकेकडून विसर्जनाची पार्श्वभूमीवर करण्यात येत आहेत. मुंबईत प्रमुख विसर्जन स्थळी २११ स्वागत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे, तसेच तब्बल १० हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम, जुहूसह समुद्र किनाऱ्यासह आरे कॉलनी इतर ठिकाणच्या तलावावर विसर्जनाची तयारी केली आहे. त्याशिवाय, विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक ही तैनात करण्यात आले आहेत.
मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी
विसर्जनावेळी मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, यासाठी मुंबईत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी शनिवारी या संदर्भात आदेश जारी केले आहेत. यामध्ये ४ सप्टेंबर रोजी पाच दिवसाच्या, ५ सप्टेंबर रोजी गौरी-गणपती, ६ सप्टेंबर रोजी सात दिवसांच्या, तर ९ सप्टेंबर, अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. त्यानिमित्त मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर विसर्जन होते. यावेळी भक्तांची, पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community