दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार आहे. त्याचवेळी मात्र गणेश मूर्तीच्या आक्षेपार्ह आकाराच्या मूर्तींनी गणेश भक्तांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
सध्या गंमत वा इको फ्रेंडली म्हणून कागद, गोमय, तुरटी, पुठ्ठा आदींचे गणपती बनवले जातात. पार्थिव मूर्ती याचा अर्थ काळी माती, लाल माती, शाडू माती असा होतो. या मातीपासून बनवलेली मूर्ती असावी. गणपती हा गणपतीप्रमाणेच असावा. तो सिनेनट, अंतराळ वीर, शिवराय, सुभाषबाबू, नरेंद्र मोदी वा राजकीय नेत्यांच्या रुपात नसावा. नाचणारा, तबला वाजवणारा किंवा ‘सैराट’ मधील आर्ची-परश्याच्या रुपातला, बाहुबली, छोटा भीम सारखा गणपती करु नये. आता अभिनेत्याच्या रूपात गणेश मूर्ती तयार होत आहे. पुष्पा चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुन याच्या रुपात श्री गणेशाला दाखवून ‘झुकेगा नही साला’ एवढेच लक्षात राहील आणि याची आठवण करून देईल. असे केल्याने जाणीवपूर्वक कुणीतरी डाव्यांकडून असे मुद्दाम पसरवले जात नाही ना, याचा शोध घेतला पाहिजे. देवाला देवाच्या रुपात दाखवा.
– डॉ. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय व्याख्याते आणि इतिहासकार.
विचित्र आकाराच्या मूर्तीने भावना दुखावतात
दाक्षिणात्य भागातील ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: The Rise) या सिनेमाने सगळ्यांना भुरळ घातली, आजही या सिनेमाची क्रेझ आहे. मात्र या हौशेने गणेशाचा अवमान होत आहे. कारण गणेशोत्सवात पुष्पा स्टाइल बाप्पाची मूर्ती बनवण्यात आली आहे. पुष्पा स्टाइल बाप्पाच्या मूर्तीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे यंदा काही ठिकाणी पुष्पा स्टाइलमधील गणेशमूर्ती घरोघरी बसवली जाणार आहे. अल्लू अर्जुनचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यामुळे त्याचे चाहते त्याच्या स्टाइलमध्ये बाप्पाचे आगमन करत आहेत. श्रीगणेशाची मूर्ती आक्षेपार्ह आकारात बनवली जाते, कुणी सैनिकाच्या वेषात गणपती बनवतात, तर काही ठिकाणी बाहुबलीचा गणपती बनवला जातो, तर काही ठिकाणी लहान मुलांना आवडती म्हणून कार्टूनच्या आकारात मूर्ती बनवल्या जातात, यातूनही श्री गणेशाचे विडंबन होत आहे, त्यामुळे गणेशभक्तांकडून संताप व्यक्त होत आहे.
Join Our WhatsApp Communityश्री गणेश बुद्धीची देवता आहे, गणेशोत्सवात श्री गणेशाची विविध रूपे पुजली जातात, ती त्याच्या कार्यानुसार आणि नावानुसार असायला हवीत. तरच त्यातून त्याची योग्य लाभदायक स्पंदने प्रक्षेपित होतील; मात्र सध्या गणेशोत्सवाच्या काळात या रुपांच्या ऐवजी भलतीच रूपे कलात्मकतेच्या नावे प्रचलित केली जात आहेत. हे मूर्तीशास्त्राच्या विरुद्ध आहे. श्री गणेश, श्री विष्णु, कार्तिकेय, शिव, आदी सर्व देवतांची रूपे शास्त्रांत वर्णन केलेली असतांना आज पुष्पा सिनेमातील अभिनेत्याच्या रुपात, पोस्टमन, क्रिकेटपटू, राजकारणी आदींच्या रुपात श्री गणेशाची मूर्ती बनवणेच मुळात अयोग्य आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांची शक्ती एकत्र असते, असे शास्त्रांत म्हटले आहे. साखर, गूळ यांचे नाव घेतल्यावर त्यांचे रूप डोळ्यासमोर येते आणि त्यांची चव वेगळी असल्याचे लक्षात येते. त्यामुळे शास्त्रानुसार नसलेल्या अशा मूर्तीतून कोणताही आध्यात्मिक लाभ होणार नाही. म्हणून हिंदू समाजानेच अशा मूर्तींना विरोध केला पाहिजे. हिंदू जनजागृती समिती अनेक वर्षे या संदर्भात जागृती करत आहे. आता हिंदूनीच पुढाकार घेऊन अशा मुर्ती नाकारल्या पाहिजेत.
– रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदू जनजागृती समिती