Ganeshotsav 2024 : श्री गणेश चतुर्थी – शास्त्र आणि महत्त्व

215
Ganeshotsav 2024 : श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व

गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर 1 सहस्र पटीने कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो. सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो. श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणाऱ्या व्रताविषयीचे शास्त्र आणि कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन करण्याचे महत्त्व सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखात समजून घेऊया.

कुटुंबात गणेश मूर्ती कोणी बसवावी ? :

श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत हे सिद्धीविनायक व्रत या नावाने ओळखले जाते. वास्तविक हे व्रत सर्व कुटुंबांत होणे क्रमप्राप्त आहे. सर्व भाऊ एकत्र रहात असतील म्हणजेच त्यांचा द्रव्यकोश (खजिना) आणि पाकनिष्पत्ती (चूल) एकत्र असेल, तर सर्वांत मिळून एक मूर्ती पुजली तरी चालते; पण ज्या वेळी द्रव्यकोश आणि पाकनिष्पत्ती कोणत्याही कारणास्तव विभक्त असतील, तर त्यांनी आपापल्या घरी स्वतंत्र गणेशमूर्ती पुजावी. ज्या कुटुंबात एकच गणपति बसवण्याची दृढ परंपरा आहे, त्या कुटुंबात ज्या भावामध्ये देवाविषयी अधिक भाव आहे, त्याच्याच घरी गणपति बसवावा. (Ganeshotsav 2024)

(हेही वाचा – Shiv Sena : मुंबईत उबाठाला खिंडार, आतापर्यंत ५५ नगरसेवक शिवसेनेत परतले)

नवीन मूर्तीचे प्रयोजन :

पूजेत गणपति असला, तरी गणपतीची नवीन मूर्ती आणावी. श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेशलहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्ती येईल. जास्त शक्ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात. म्हणून गणेशलहरींचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात आणि ती मूर्ती नंतर विसर्जित करतात.

श्री गणेश चतुर्थीला पुजावयाची मूर्ती कशी असावी ? :

चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी, तसेच पर्यावरणाला घातक आहे. मूर्तीची उंची अधिकाधिक एक फूट ते दीड फूट असावी. मूर्ती शास्त्रानुसार बनवलेली, पाटावर बसलेली, डाव्या सोंडेची अन् नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. परंपरा किंवा आवड यांप्रमाणे गणेशमूर्ती आणण्यापेक्षा धर्मशास्त्रसंमत गणेशमूर्ती पुजावी. (Ganeshotsav 2024)

(हेही वाचा – Akshay Kumar House : खिलाडू कुमार अक्षय कुमारचं मुंबईतील ड्युप्लेक्स घर आहे इतक्या कोटींचं)

शास्त्रोक्त विधी आणि रूढी यांचा अवधी :

भाद्रपद शुद्ध चतुर्थीस मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची सिद्धीविनायक या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे, असा शास्त्रविधी आहे; पण मनुष्य हा उत्सवप्रिय असल्याने एवढ्याने त्याचे समाधान होईना; म्हणून दीड, पाच, सात किंवा दहा दिवस श्री गणपति ठेवून त्याचा उत्सव करू लागला. बरेच जण (ज्येष्ठा) गौरीबरोबर गणपतीचे विसर्जन करतात. एखाद्याच्या कुलाचारात गणपति पाच दिवस असेल आणि तो त्याला दीड किंवा सात दिवसांचा करावयाचा असला, तर तो तसे करू शकतो. यासाठी अधिकारी व्यक्तीस विचारण्याची जरूरी नाही. रूढीप्रमाणे पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या, सहाव्या, सातव्या किंवा दहाव्या दिवशी श्री गणेशविसर्जन करावे.

मध्यपूजाविधी :

गणपति घरी असेपर्यंत प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी प्राणप्रतिष्ठा सोडून गणपतीची नेहमी पूजा करतो तशी पूजा करावी आणि शेवटी आरत्या आणि मंत्रपुष्प म्हणावे. गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर प्रतिदिन करावयाची पंचोपचार पूजा करावी.

उत्तरपूजा :

गणपतीच्या विसर्जनापूर्वी ही पूजा करायची असते. विशिष्ट मंत्र म्हणून पुढे दिल्याप्रमाणे पूजा करावी – 1. आचमन, 2. संकल्प, 3. चंदनार्पण, 4. अक्षतार्पण, 5. पुष्पार्पण, 6. हरिद्रा (हळद)-कुंकूमार्पण, 7. दूर्वार्पण, 8. धूप-दीप दर्शन आणि 9. नैवेद्य. यानंतर आरती करून मंत्रपुष्पांजली समर्पावी. सर्वांनी गणपतीच्या हातावर अक्षता द्याव्या आणि मूर्ती उजव्या हाताने हालवावी. (Ganeshotsav 2024)

(हेही वाचा – Reliance Bonus Share : रिलायन्स कंपनी भागधारकांना देणार एकावर एक बोनस शेअर)

विसर्जन :

उत्तरपूजेनंतर मूर्तीचे जलाशयात विसर्जन करतात. विसर्जनाला जातांना गणपतीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी आणि मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी.

कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन करण्याचे महत्त्व ! –

गणपति हा दहा दिशांचा स्वामी आहे. त्याच्या अनुमतीविना इतर देवता पूजास्थानी येऊ शकत नाहीत. गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करत असतो, ती तेथे येऊ शकते; म्हणून कोणतेही मंगल कार्य किंवा कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम गणपतीचे पूजन करतात. गणपति वाईट शक्तींना पाशाने बांधून ठेवत असल्याने त्याच्या पूजनामुळे शुभकार्यात येणारी विघ्ने दूर होतात. गणपतीने मानवाच्या नादभाषेचे देवतांच्या प्रकाशभाषेत रूपांतर केल्यामुळे आपल्या प्रार्थना देवतांपर्यंत पोहोचतात.

डाव्या सोंडेचा गणपति अध्यात्माला पूरक असणे ! –

पूजेत शक्यतो डाव्या सोंडेचा गणपति ठेवावा. ‘उजव्या सोंडेचा गणपति हा अतिशय शक्‍तीशाली आणि जागृत आहे’, असे म्हटले जाते. पूजेत उजव्या सोंडेचा गणपति असल्यास कर्मकांडातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून दैनंदिन पूजाविधी पार पाडावे लागतात. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कर्मकांडातील नियमांचे काटेकोरपणे पालन करणे शक्य होत नसल्याने पूजाविधीमध्ये चुका होतात आणि त्याचा आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. यासाठी पूजेत शक्यतो उजव्या सोंडेचा गणपति ठेवू नये. याउलट डाव्या सोंडेचा गणपति तारक स्वरूपाचा आणि अध्यात्माला पूरक असतो. याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते. (Ganeshotsav 2024)

(हेही वाचा – उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर; Uday Samant यांची माहिती)

श्री गणेश चतुर्थी या दिवशी चंद्रदर्शन करणे वर्ज्य असणे –

श्री गणेश चतुर्थीला ‘कलंकित चतुर्थी’ असेही म्हणतात. या चतुर्थीला चंद्र पहाणे वर्जित आहे. चुकूनही चतुर्थीचा चंद्र दिसल्यास ‘श्रीमद्भागवता’च्या 10 व्या स्कंधाच्या 56-57 व्या अध्यायात दिलेली ‘स्यमंतक मण्याची चोरी’ ही कथा आदराने वाचली किंवा ऐकली पाहिजे. भाद्रपद शुक्ल तृतीयेचा किंवा पंचमीचा चंद्र पहावा. यामुळे चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यास त्याचा अधिक धोका रहात नाही. चुकून चंद्रदर्शन झाल्यास पुढील मंत्राने अभिमंत्रित केलेले पवित्र जल प्राशन करावे. या मंत्राचा 21, 54 किंवा 108 वेळा जप करावा.

सिंहः प्रसेनमवधीत् सिंहो जाम्बवता हतः ।
सुकुमारक मा रोदीस्तव ह्येष स्यमन्तकः ।। – ब्रह्मवैवर्त पुराण, अध्याय 78

अर्थ : हे सुंदर सुकुमार ! या मण्यासाठी सिंहाने प्रसेनला मारले आहे आणि जांबुवंताने त्या सिंहाचा संहार केला आहे; म्हणून तू रडू नकोस. आता या स्यमंतक मण्यावर तुझाच अधिकार आहे.

गणेश चतुर्थी निमित्त होणारे गैरप्रकार राेखून श्री गणेशाची कृपा संपादन करा !
सुखकर्ता, विघ्नहर्ता अन् अष्टदिशांचा अधिपती म्हणजे श्रीगणपति ! वेदांच्या माध्यमातून धर्मशास्त्र सांगणारी ही देवता जशी विद्यापती आहे, तशीच ती असुरांचा नाश करणारीही आहे. म्हणूनच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने धर्माचरण शिकणे, तसेच गणेशोत्सवातील अपप्रकारांचे उच्चाटन करून धर्मरक्षणाचा संकल्प करणे, ही श्री गणेशाची खरी उपासना ठरेल ! (Ganeshotsav 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.