Ganeshotsav 2024 : गणपतीची आरती करूया; आक्रस्ताळा गोंधळ नको !!

120
Ganeshotsav 2024 : पुणे शहरातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीस बंद
मकरंद करंदीकर

गणेशचतुर्थीला आजही घराघरातून गणपतीची प्राणप्रतिष्ठा, पूजा, आरती, अभिषेक, अथर्वशीर्ष पठण, नैवेद्य अशा गोष्टी अतिशय श्रद्धापूर्वक केल्या जातात. पण काही घरगुती गणेशोत्सवामध्ये आणि अनेक सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आता खूप बदल होताना दिसतात. उत्सवी मांडवांमध्ये कोंबडी, पोपट, मैना, म्हावरा, चिमणी, लुंगी, दांडा, रिक्षा, झिंगाट अशा अनेक शब्दांवरील गाणी आपल्या कानांच्या, भक्तीच्या आणि मराठी संस्कृतीच्या चिंधड्या उडवत असतात ! पण आपल्या गणपतीच्या आरत्या हा सुद्धा आता धार्मिक कार्यक्रम राहिलेला नसून तो आता एक रियालिटी शो होत चालला आहे. आपण कुठल्या आरत्या म्हणतोय, काय शब्द म्हणतोय, चाल कुठली लावली आहे अशा गोष्टींकडे लक्ष न देता केवळ एक उपचार म्हणून तो दणदणाटात (गदारोळात) पाळला जातो. (Ganeshotsav 2024)

(हेही वाचा – ias officer salary : IAS अधिकार्‍यांबद्दल आपल्या मनात आदर असतो! ह्यांना पगार किती मिळतो माहितीय का?)

आपल्याकडे आरती आणि सामूहिक प्रार्थना याचा फार उत्तम प्रकारे विचार केला गेला आहे. जर ५०० लोकांनी एकाच वेळी, एकच प्रार्थना देवापुढे केली तर प्रत्येकाला पाचशे वेळा ही प्रार्थना केल्याचे पुण्य लाभते असा आपल्याकडे संकेत आहे. अन्य धर्मांमध्ये त्या त्या धर्माचा पुरोहित हा स्वतः प्रार्थना करतो आणि उपस्थित लोकांनी फक्त त्याला दुजोरा द्यायचा असतो. आपल्याकडे मात्र विविध आरत्या, मंत्रपुष्पांजली, अनेक मंत्र, जयजयकार, जप हे प्रत्येक जण सामील होऊन, आपणहून म्हणू शकतो. समाजाने एकत्र येऊन एका तालासुरात प्रार्थना म्हणण्यामुळे समाजातील एकवाक्यता वाढते. मागेपुढे जाणारे एकमेकांच्या बरोबर राहणे शिकतात. गायन येत नसेल, कुणाचा आवाज चांगला नसेल तरीही सामूहिक प्रार्थना ही अशा सर्वांना सामावून घेते. पण आता अनेक पांढरपेशा मंडळींना आरती म्हणायचीच लाज वाटू लागली आहे. आपल्याच धर्मातील ऐक्य, धर्म म्हणून एकत्र येणे, लोकशाहीसारख्या व्यवस्थेवरही आपल्या धर्माचा ठसा उमटविणे अशा गोष्टी आता आपल्याला अन्य धर्मियांकडून शिकायला हव्यात का ?

आपल्या विविध संतांनी रचलेल्या, शेकडो वर्षे जुन्या आरत्यांना त्या संतांच्या अपार भक्तीची पार्श्वभूमी लाभली आहे. काही मराठी आरत्या आणि गणपती पूजेनंतर “गणपती बाप्पा मोरया” हा मराठीतला जयजयकार तर अगदी मूळ अमेरिकन, ब्रिटीश, जपानी, कोरियन मंडळीही मराठीतूनच करताना ( युट्युबवर) पाहायला मिळतात. आपल्या बहुतेक आरत्या या प्राकृतात, साध्या सोप्या मराठीत रचलेल्या आहेत. अन्य भाषिकांमध्ये त्यांच्या भाषेतील आरत्या फारशा प्रचलित नव्हत्या. ही मंडळी येथे मराठी आरत्या म्हणायला शिकली, आपापल्या प्रांतात त्या आरत्या त्यांनी नेल्या. मराठी संस्कृती सहजपणे पसरत होती. पण आपल्याला मात्र त्या आरत्या जुन्या, कालबाह्य वाटायला लागल्या. आपल्यापैकी अनेकांना संत कवींच्या या आरत्यांऐवजी व्यावसायिक गीतकारांनी रचलेली सिनेमातील गाणी ह्याच आरत्या वाटायला लागल्या.

येई हो विठ्ठले माझे माउली ये आणि आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रम्ह अशा कांही आरत्या तर खूप ओरडूनच म्हटल्या पाहिजेत अशी आपली पारंपारिक समजूत झाली आहे. सर्वात विडंबन म्हणजे आरतीनंतर म्हटले जाणारे “देवे ” म्हणजेच मंत्रपुष्पांजली ! हे खरेतर एक आद्य राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. अतिशय सुंदर रचना आणि मंत्रमुग्ध करणारे हे मंत्र , अनेक ठिकाणी मात्र सामूहिकपणे देवावर खेकसत, देवाच्या अंगावर धावून जात, त्याला खडसावून काही विचारतोय अशा तऱ्हेने म्हटले जातात. दोन शब्दांमधले अवग्रह ( म्हणजे SSS चिन्हांकित लांब ‘आ ‘ कार ) कितीही वेळ ताणून धरून एकमेकांकडे पाहत विचित्र जुगलबंदीचा आनंद घेतला जातो. ही विटंबना आपण थांबवायला नको का ?

भरकटत चाललेली ही मराठी सांस्कृतिक चाल आपणच सावरायला हवी. अधिकाधिक मंडळींनी गणपतीची पूजा – आरती ही जास्तीतजास्त योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायला हवा. बाकीचा उत्सव हा मनोरंजनासाठी असतोच ना ? (Ganeshotsav 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.