डोंबिवली हादरली! ३३ जणांनी केला ९ महिने बलात्कार

व्हिडिओच्या माध्यमातून पीडित मुलीला ब्लॅकमेल करत वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला.

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोंबिवली पूर्व येथे असणाऱ्या भोपर गाव या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर ३३ जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी दुपारपर्यंत पोलिसांनी २६ जणांना अटक केली असून, त्यात दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. या घटनेने संपूर्ण डोंबिवली शहर हादरले आहे. पीडित मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी ३३ जणांविरुद्ध बलात्कार, ब्लॅकमेलींग, पॉस्को आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

(हेही वाचाः राज्यात महिला सुरक्षित? गेल्या काही दिवसांत घडल्या ‘इतक्या’ बलात्काराच्या घटना)

नराधमांचा क्रूरपणा

डोंबिवली पूर्व भोपर परिसरात पीडित मुलगी ही कुटुंबीयांसह राहते. या पीडित मुलीचे त्याच परिसरातील एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. जानेवारी महिन्यात या तरुणाने पीडित मुलीवर बळजबरीने बलात्कार करुन बलात्काराचा व्हिडिओ मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ त्याने आपल्या मित्रांना पाठवला. त्याच्या मित्रांनी या व्हिडिओच्या माध्यमातून पीडित मुलीला ब्लॅकमेल करत वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला.

नऊ महिने केला छळ

या व्हिडिओच्या माध्यमातून जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत ३३ जणांनी पीडित मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला असून, त्यात काही जणांनी वारंवार तिच्यावर अत्याचार केले आहेत. तिच्यावर सतत होणाऱ्या या प्रकारामुळे पीडित मुलीची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. सतत होणाऱ्या या छळाला कंटाळून अखेर तिने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. हा प्रकार ऐकून पीडित मुलीचे कुटुंबीय हादरले व त्यांनी बुधवारी रात्री मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

(हेही वाचाः राज्यपालांनी महिला सुरक्षेसाठी लिहिलेल्या पत्राला सरकारकडून केराची टोपली?)

२१ जणांना अटक

मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी मुलीचा जबाब नोंदवून ३३ जणांविरुद्ध बलात्कार, पोक्सो, ब्लॅकमेलिंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन पीडित मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्रीपासून आरोपींची धरपकड सुरू करुन पोलिसांनी २६ जणांना अटक केली आहे. फरार झालेल्या 7 आरोपींचा कसून शोध घेण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here