कुख्यात डॉन बाहेर, पोलिसांची वाढणार डोकेदुखी!

शार्प शूटर रवींद्र सावंत याने अश्विन नाईकवर गोळी झाडली होती. ही गोळी अश्विनच्या डोक्यातून आरपार गेली होती, त्यातून देखील अश्विन बचावला.

169

मुंबईतील गुन्हेगारी क्षेत्रात अरुण गवळीचा प्रतिस्पर्धी अश्विन नाईक याची दादर येथील खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली आहे. बुधवारी अश्विन नाईक हा तळोजा तुरुंगातून बाहेर पडला. त्याच्यासोबत त्याचे इतर सहकारी देखील या गुन्ह्यातून निर्दोष सुटले आहेत. त्यामुळे हा अश्विन नाईक नेमका कोण आहे, असा सवाल पुन्हा एकदा ऐकायला मिळत आहे.

काय होता गुन्हा?

दादर येथील एका बांधकाम विकासकाकडे ५० लाख रुपयांची मागणी आणि ६ हजार चौरसमीटरचा फ्लॅट खंडणी स्वरुपात मागून विकासकाचे अपहरण केल्याप्रकरणी डिसेंबर २०१५ मध्ये दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी परिमंडळ-५ च्या विशेष पथकाने अश्विन नाईक आणि त्याचे साथीदार प्रमोद केळुस्कर, प्रथमेश परब, जनार्दन सकपाळ, राजेश तांबे, अविनाश खेडेकर, मिलिंद परब आणि सुरज पाल यांना अटक केली होती. या सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती.

(हेही वाचाः मानेवर बसलेले भूत काढण्यासाठी मांत्रिकाने मुलीसोबत केले ‘हे’ कृत्य)

सात वर्षांनी सुटका

मुंबईच्या सत्र न्यायालयात या प्रकरणाचा खटला सुरू असताना, अश्विन नाईक आणि त्याचे साथीदार नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी होते. मंगळवारी या खटल्याची सुनावणी विशेष सत्र न्यायालयात झाली. न्यायालयाने अश्विन नाईक आणि त्याचे इतर साथीदार यांची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल सात वर्षांनी आश्विन नाईक आणि त्याचे इतर साथीदार बुधवारी तळोजा आणि ठाणे कारागृहातून बाहेर पडले आहेत.

डोक्यातून आरपार गोळी, तरी अश्विन वाचला

अश्विन नाईक हा गुन्हेगारी क्षेत्रातील नामचीन गँगस्टर आणि अमर नाईक याचा भाऊ आहे. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर मुंबईतील गुन्हेगारी क्षेत्रातील सर्व समीकरणे बदलली. दाऊद इब्राहिम भारतातून पळून दुबईत गेल्यानंतर, दाऊदच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या मुंबईतील टोळ्यांनी आपापल्या वेगळ्या टोळ्या बनवल्या होत्या. ९३च्या बॉम्बस्फोटानंतर छोटा राजनने दाऊदची साथ सोडून स्वतःची वेगळी टोळी बनवून स्वतःला हिंदू डॉनचा दर्जा दिला.

(हेही वाचाः प्रेयसीच्या पतीला पळवून लावण्यासाठी त्याने रचला खतरनाक कट!)

छोटा राजन हा मलेशियात बसून आपली टोळी चालवत होता. त्यावेळी अरुण गवळी आणि अमर नाईक यांना मुंबईत रान मोकळे मिळाले आणि दोघांनी परस्परविरोधी टोळ्या तयार करुन दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला.
१९९४ मध्ये अरुण गवळी टोळीचा शार्प शूटर रवींद्र सावंत याने न्यायालयात अमर नाईक याचा भाऊ अश्विन नाईक याच्यावर गोळी झाडली होती. ही गोळी अश्विनच्या डोक्यातून आरपार गेली होती, त्यातून देखील अश्विन बचावला. या घटनेनंतर गवळी टोळी आणि नाईक टोळीत गँगवार सुरू झाले आणि १९९६ ला अमर नाईक हा पोलिस चकमकीत ठार झाला. पोलिस अधिकारी विजय साळसकर यांनी अमर नाईकला चकमकीत ठार केले होते.

बायकोचीच दिली सुपारी

१९९९ मध्ये अश्विन नाईकला अटक करण्यात आली होती. अश्विन नाईक हा तुरुंगात असताना त्याची पत्नी शिवसेना नगरसेविका नीता नाईक हिचे तिच्या अंगरक्षकासह संबध असल्याच्या संशयावरुन अश्विन नाईकने टोळीचा शार्प शूटर सुनील जाधव उर्फ ऐक्या याला पत्नीच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप अश्विन नाईकवर लावण्यात आला. नीता नाईक यांची हत्या नोव्हेंबर २००० मध्ये चिंचपोकळी येथे करण्यात आली. त्यानंतर सुनील जाधव उर्फ ऐक्या याला २००५ मध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी कांदिवलीच्या चारकोपमध्ये चकमकीत ठार केले होते.
दहा वर्षे तुरुंगात काढल्यानंतर अश्विन नाईक हा २००९ मध्ये तुरुंगातून बाहेर आला.

(हेही वाचाः …आणि ‘दगडी चाळ’ बनली गवळीचे साम्राज्य!)

गवळीच्या अटकेनंतर नाईक अ‍ॅक्टिव्ह

अश्विन नाईक तुरुंगात असताना आणि अमर नाईक चकमकीत ठार झाल्यानंतर याकाळात अरुण गवळीच्या टोळीने वर्चस्व गाजवले. मात्र २००८ मध्ये शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येची सुपारी अरुण गवळीला मिळाली आणि त्याने आपल्या गुंडामार्फत जामसांडेकर याची घरात घुसून हत्या केली. या प्रकरणात अरुण गवळीला अटक करण्यात आली होती. अरुण गवळीच्या अटकेनंतर अश्विन नाईक याने मुंबईत डोके वर केले व बांधकाम व्यवसायिक आणि हॉटेल व्यवसायिकांकडे खंडणी वसुली सुरू केली होती. २०१५मध्ये अखेर एका बांधकाम व्यवसायिकाच्या अपहरण आणि खंडणी प्रकरणात अश्विन नाईक आणि त्याच्या साथीदारांना अटक झाली होती. तब्बल सात वर्षांनी अश्विन नाईक आणि त्याच्या साथीदारांची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.