पलावा सिटीत फ्लॅटमध्ये करत होते शेती… कमवले कोट्यवधी! कोणती होती ही शेती?

या शेतीतून ही मंडळी वर्षाला कोट्यवधींचे पीक काढत होती.

92

घर हे राहण्यासाठी घेतले जाते, पण मरिन इंजिनियर असलेल्या एका पठ्ठ्याने शेती करण्यासाठी घर विकत घेतले. ते सुद्धा डोंबिवलीच्या पलावा सिटीमध्ये. आता तुम्ही विचाराल घरात त्याने कशी शेती केली असेल? काय येडं बनवता काय राव? पण खरंच ते शेती करत होते. या शेतीतून थोडे थोडके नाही, चांगली कोट्यवधी रुपयांची कमाई करत होते. कसली होती हे शेती?

असे कमावत होते कोट्यवधी!

जावेद जहांगीर शेख आणि अरशद खत्री अशी या दोघांची नावे आहेत. अरशद हा मरिन इंजिनियर असून हायड्रोपोनिक तंत्राद्वारे शेतीचा तज्ञ आहे. पलावा सिटीमध्ये त्याने टू-बीएचके फ्लॅट त्याने खरेदी केला होता. या फ्लॅटच्या प्रत्येक खोलीत हायड्रोपोनिक वीडची (उच्च दर्जाचा गांजा) शेती तो करत होता. तर जावेद हा वितरण व्यवस्था आणि इतर कामे बघत होता. तर या दोघांना आर्थिक रसद दुबईत बसलेला रेहान पुरवत होता. कुणाला कानोकान खबर न लागू देता या शेतीतून ही मंडळी वर्षाला कोट्यवधींचे पीक काढत होती.

(हेही वाचाः कुरियर बॉय बनून चोरी करून गेला! पोलिसांनी ५ तासात पकडला! )

बिंग फुटले!

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने मुंबई परिसरातून जावेद जहांगीर शेख आणि अरशद खत्री या दोघांना अटक केल्यानंतर, या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन करण्यात आलेल्या शेतीचे बिंग फुटले. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाने गुरुवारी रात्री डोंबिवलीच्या पलावा सिटीतील टू बीएचके फ्लॅटवर छापा टाकून, १ किलो १०० ग्राम हायड्रोपोनिक वीड (किमंत सुमारे ५० लाख ) हस्तगत करण्यात आली आहे. तसेच या फ्लॅटमधून शेती लागवडीचे सेटअप, पीएच नियामक, वनस्पतींचे पोषक घटक, चिकणमाती गारगोटी, पाण्याचे पंप, एअर सर्क्युलेशन सिस्टम, CO2 गॅस सिलिंडर आणि विशिष्ट प्रकारचे लाईट्स जप्त करण्यात आले आहेत.

नेदरलँड येथून मागवली बियाणे ..

युरोपमधील नेदरलॅंडची राजधानी ॲमस्टरडॅम येथून हायड्रोपोनिक वीड (गांजा)चे बियाणे डार्कनेट या वादग्रस्त वेबसाइटच्या माध्यमातून मागवली जात होती. त्यासाठी लागणारे अत्याधुनिक साहित्य भारतातूनच खरेदी करुन, ७०० स्क्वेअर फूटच्या या फ्लॅटमध्ये या बियांची लागवड करण्यात येत होती.

(हेही वाचाः हॉटेलमध्ये महिला होती कॉरंटाईन… कर्मचा-याने तिच्यासोबत जे केले, ते वाचून धक्का बसेल!)

सर्वात जास्त मागणी कुठे?

या शेतीतून निघणारा गांजा हा उच्च दर्जाचा गांजा मानला जातो. या गांजाला पार्टी, पब्ज आणि बॉलिवूड मध्ये मोठी मागणी आहे. एक ग्राम गांजा ८ हजार रुपयांना विकला जातो, म्हणजे सोन्यापेक्षा दुप्पट भावात या गांजाची विक्री होते. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वांद्रे, वर्सोवा, लोखंडवाला, ओशिवरा तसेच नवी मुंबईतील उच्च वसाहत, पुण्यातील क्लब, डिस्कोथेफ, पब मध्ये या गांजाला सर्वात अधिक मागणी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.