कोरोनामुळे दोन वर्षे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. यावर्षी कोरोनाचे सावट दूर झालेले असून मुंबईत यंदाचा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार आहे. मुंबईतील लहान मोठी गणेशोत्सव मंडळे जोमाने कामाला लागले आहेत. यंदाच्या वर्षी मुंबईत गणेशभक्ताचा पूर येणार असून, या पुरात हात धुण्यासाठी भुरट्या चोराच्या टोळ्या मुंबईत दाखल होऊ लागल्या आहेत.
या टोळ्यांनी आपला पहिला हिसका चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्यात दाखवला आहे. चिंतामणीच्या आगमन सोहळा मिरवणुकीत सामील झालेल्या ७२ गणेशभक्तांचे मोबाईल चोरी झाले असून, हे मोबाईल या टोळ्यांनी चोरल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.
टोळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशात पोलीस
लालबागचा राजा, गणेश गल्लीसह मुंबईतील इतर गर्दीच्या गणेश मंडळाच्या मुंबई पोलिसांनी बैठका घेतल्या आहेत. या बैठकीत मंडळातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सतर्क राहण्यासाठी सांगण्यात आले आहे. कुठलीही व्यक्ती संशयास्पद हालचाल करताना आढळून आल्यास पोलिसांना तत्काळ सूचना देण्यात यावी. दर्शनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना सतर्क राहून आपल्या जवळील मौल्यवान वस्तू मोबाईल फोनची काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. पोलिसांचे पथकदेखील साध्या वेशात गर्दीत मिसळून गुन्हेगारी कृत्य करणारे, मोबाईल चोर, महिलांची छेड काढणाऱ्यावर लक्ष ठेवून असणार आहेत.
( हेही वाचा: भाजपा सिरीयल किलर, मग आप सिरीयल डीलर? )
टोळ्यांच्या शोधासाठी पथके तयार
मुंबईत उत्सवाच्या दरम्यान गर्दीच्या ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या टोळ्या परराज्यातून मुंबईत दाखल होत आहेत. या टोळ्या दक्षिण मुंबईतील लॉजमध्ये खोली घेऊन राहतात. गणेशोत्सवात या टोळ्या गर्दीत मिसळून महिलांच्या पर्स, सोनसाखळी, मोबाईल खेचून गर्दीतून पसार होतात. या टोळ्यांवर पोलिसांची नजर राहणार आहे. यासाठी पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली असून, मुंबईतील हॉटेल लॉजवर पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे. त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या गाडयांतून मुंबईत येणाऱ्या संशयितावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. नाकाबंदी, वाहन तपासणी सुरू करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community