गणपती आपल्याला कोणती शिकवण देतो?

169

गणपतीला गणनायक म्हणून संबोधले जाते. गणनायक या शब्दाचा अर्थ लोकनायक असा होतो. त्याचप्रमाणे गणराज याचा नायक असाही होतो. म्हणजेच गणपती ही राष्ट्राची देवता आहे. लोकमान्य टिळकांनी या राष्ट्र देवतेचा उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यास आरंभ केला तो पारतंत्र्याच्या काळात. त्याला सुमारे सव्वाशे वर्षांचा काळ लोटला.

दूरदृष्टी असणे गरजेचे

या राष्ट्र देवतेमध्ये अनेकविध गुण आहेत. ते गुण आपल्यात उतरवण्यासाठी आपण प्रयत्न करणे हीच राष्ट्रसेवा ठरणार आहे. गणपती हा बुद्धिमान असून लोकनायक आहे किंवा गणराज्याचा नायक आहे. त्याची बुद्धी तेजस्वी आहे. ज्याला आपल्या राष्ट्राचे, आपल्या समाजाचे नेतृत्व करायचे आहे त्याची बुद्धी तेजस्वी असली पाहिजे.‌ त्याचबरोबर त्याच्याकडे दूरदृष्टी असली पाहिजे. म्हणजेच त्याला भविष्याचा वेध घेता आला पाहिजे.

गणराज्याचा नायक कसा असावा?

तरच तो भविष्यात संभाव्य असलेल्या अडचणींचा किंवा संकटांचा वेध घेऊन त्यावर उपाययोजना करू शकतो. त्या अडचणी, ती संकटे टाळू शकतो. राष्ट्राच्या उत्कर्षाच्या, विकासाच्या, हिताच्या आड येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांचे निवारण करण्याचे सामर्थ्य ज्याच्याकडे आहे तोच गणराज्याचा नायक होण्यास पात्र आहे. असा श्रेष्ठ धडा गणराया आपल्याला शिकवतो आहे.

शस्त्रविद्येत आणि युद्धशास्त्रात पारंगत असावा

शत्रूच्या हालचालींवर पाळत ठेवून शत्रूच्या नकळत त्याच्यावर हल्ला करून त्याच्यावर आपला वचक बसवण्याचे काम लोकनायकाला किंवा गणराज्याच्या नायकाला सहजपणे करता आले पाहिजे. याचाच अर्थ लोकनायक, गणनायक हा शस्त्रविद्येत आणि युद्धशास्त्रात निपूण असला पाहिजे. गणरायांनी स्वतःच्या आचरणाने आपल्याला हीच शिकवण दिली आहे.

बुद्धीचे श्रेष्ठत्व जपावे

गणनायक हा बुद्धीचे श्रेष्ठत्व जाणणारा आहे. तो स्वतः बुद्धिमान असल्यामुळे सर्वसामान्य माणसांनी सुद्धा आपल्या बुद्धीचा विकास केला पाहिजे अशी तो शिकवण देतो. कारण बुद्धीमुळेच माणसाला श्रेष्ठत्व प्राप्त होते. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी बुद्धीच उपयुक्त ठरते.‌ सोन्याच्या, चांदीच्या, हिऱ्यांच्या अलंकारापेक्षा बुद्धी हा अलंकार श्रेष्ठ आहे अशी शिकवण देणारा गणराय बुद्धीची देवता म्हणूनच पूजला जातो.‌ हे आपण विसरायचे नाही. म्हणूनच देशातल्या प्रत्येकाने राष्ट्राच्या उत्कर्षासाठी, विकासासाठी आपले बुद्धी सामर्थ्य वाढवणे नितांत आवश्यक आहे. हे आपण गणरायाकडून शिकायचे आहे.

समाजामधल्या विद्यासंपन्न, ज्ञानी लोकांनी सर्वसामान्य बुद्धीच्या आपल्या बांधवांच्या भोळ्या भाबड्या भावनांची कदर केली पाहिजे.‌ त्यांच्या भोळ्या भाबड्या भावनांमुळे राष्ट्रहिताला, समाज हिताला बाधा येत नसेल तर त्याचा स्वीकार मोठ्या मनाने करायचा आहे. अशी शिकवण गणराया आपल्याला देतो.

बुद्धीवादी लोकांच्या अंतःकरणात सर्वसामान्य लोकांविषयी ममता भाव असला पाहिजे. रंजलेल्या गांजलेल्या लोकांना गोंजारून त्यांचे दुःख हलके करण्यासाठी तेजस्वी बुद्धी प्राप्त झालेल्या लोकांच्या अंतःकरणात मायेचा, ममतेचा झरा असेल तरच समाज सुसंघटित राहील. हे गणरायाकडून आपल्याला शिकायचे आहे. दृष्टांसाठी दोन हात करण्याची हिंमत आणि सर्वसामान्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी दयार्द बुद्धी या दोन्ही गोष्टी ज्याच्याकडे आहेत तोच लोकनायक होण्याच्या पात्रतेचा आहे अशी शिकवण गणराया आपल्याला देतो.

गणरायाने रिद्धी आणि सिद्धी या दोन गोष्टींना अंगीकारले आहे. राष्ट्राच्या उत्कर्षासाठी ऐहिक म्हणजेच भौतिक शक्तींची आवश्यकता आहे. माणसाने राष्ट्राच्या हितासाठी, राष्ट्राच्या उत्कर्षासाठी, जगात आपले राष्ट्र प्रबळ व्हावे म्हणून आपली भौतिक शक्ती आपले भौतिक सामर्थ्य वाढवले पाहिजे. या भौतिक सामर्थ्याचा उपयोग राष्ट्रीय संघटना प्रबळ करण्यासाठी होतो ही गोष्ट गणपती आपल्याला शिकवत आहे.

गणपती अथर्वशीर्ष गणपती ज्ञानमय आणि विज्ञानमय आहे असे सांगते. ही गोष्ट आपण लक्षात घेऊन आपला संपूर्ण समाज हा ज्ञानमय आणि विज्ञानमय करायचा आहे. याचा अर्थ ज्ञानाचे आणि विज्ञानाचे महत्त्व जनमानसापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे. या विश्वात ज्ञानाला आणि विज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जे राष्ट्र ज्ञान आणि विज्ञान या दोन पायांवर उभे आहे तेच राष्ट्र प्रबळ राष्ट्र म्हणून ओळखले जाते. गणनायकाने ज्ञान विज्ञानाचे महत्त्व जाणून राष्ट्र कार्य आणि समाज कार्य केले पाहिजे अशी शिकवण गणराया देतो.‌

गणरायाच्या चारित्र्याकडे, त्याच्या जीवनाकार्याकडे आपण याच दृष्टीने पाहिले पाहिजे. तरच आपण गणरायाचे निष्ठावान आणि कृतीशील अनुयायी ठरू

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.