ऋजुता लुकतुके
वीज बिल किंवा गॅस सिलिंडर बिलाचे चक्रावणारे आकडे आपण भारतातही ऐकत असतो. पण, अलीकडे एक गॅस बिल (Gas Bill of 11 Lakhs) जागतिक पातळीवर व्हायरल झालंय. इंग्लंडमधील हे प्रकरण बिलाच्या विचित्र नियमामुळे गाजतंय हे गॅस बिल आहे ४५ वर्षीय जो वूडली आणि ४४ वर्षीय ली हेन्स यांना आलेलं ११ लाख रुपयांचं बिल. नेमकं काय घडलं होतं ते पाहूया..
वूडली आणि हेन्स २००५ मध्येच स्टॅफोर्डशायरमध्ये टॅमवर्थ या भागात राहायला आले. तेव्हापासून आजतागायत त्यांना कधी घराचं गॅस बिल (Gas Bill of 11 Lakhs) आलं नव्हतं. तिथे गॅस कोणती कंपनी पुरवते याचाही धागादोरा जुन्या जोडणीत मिळत नव्हता. आणि मार्च महिन्यात केडंट या गॅस वितरक कंपनीने अचानक त्यांच्याशी संपर्क साधला. आणि घर तपासणीची परवानगी मागितली.
वूडी आणि हेन्स यांनी परवानगी दिल्यावर केडंटचे अधिकारी घराची पाहणीही करून गेले. पुढील तीन महिन्यांत दोघांच्या नावे ११,००० पाऊंडांचं बिल आलं आहे. सध्या युके बरोबरच जगभरातील वर्तमानपत्रात ही बातमी गाजते आहे.
Couple told their boisterous cat named Ernie could be to blame for eye watering £11,000 gas billhttps://t.co/aZqDoQFAwYhttps://t.co/aZqDoQFAwY
— Manchester News MEN (@MENnewsdesk) October 27, 2023
वूडी आणि हेन्स या घरात राहायला आल्यावर त्यांनी घराशी संबंधित प्रत्येक बिल भरलं आहे. पण, गॅस जोडणी कुठल्या कंपनीची आहे याचा सुगावाच त्यांना लागला नाही. अचानक मोठं बिल येण्याची भीती त्यांना होती. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला चौकशीही केली.
पण, हेन्स यांच्या मते गॅस वितरक कंपनी काही ते शोधून काढू शकले नाहीत. ‘आम्ही इथे आल्यावर सगळी जुनी बिलं तपासून पाहिली. जुनी थकबाकीही देऊन टाकली. पण, गॅस वितरक कंपनी कुठली हे जुन्या बिलांवरूनही कळलं नाही. आणि नवीन बिल कधी आमच्या नावे आलं नाही. आम्ही आमच्याकडून प्रयत्न केले. आणि म्हणूनच असं अचानक मोठं बिल येईल याची आम्हाला भीती होतीच. आम्ही युकेच्या गॅस बिलाचा कायदाही तपासला आहे. आमची चूक नसताना बिल थकलं असेल तर ते आम्हाला बिल भरण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाहीत. हेच आम्हाला केडंट कंपनीला आता सांगायचं आहे,’ असं हेन्स मीडियाशी बोलताना म्हणाले.
अठरा वर्षात कधी केडंटने बिलासाठी संपर्क केला नाही. मग १८ वर्षांनी एवढं मोठं बिल भरण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे, असं हेन्स यांचं म्हणणं आहे. हे बिल मात्र समाजमाध्यमांवर गाजतंय.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community