अंबरनाथ येथे ‘या’ वायुची गळती, ३० जण गुदमरले!

वायुगळती झालेल्या आर.के. केमिकल्स कंपनीत सल्फ्युरिक ॲसिडवर डिस्टिलेशनची प्रक्रिया केली जाते.

123

अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीत मंगळवारी सकाळी गॅस गळती झाली. आरके केमिकल्स कंपनीत ही गॅस गळती झाली असून त्यामुळे ३० जण गुदमरले आहेत. या सर्वांना उल्हानगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते. अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत आर.के. केमिकल्स नावाची कंपनी असून त्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिडवर डिस्टिलेशनची प्रक्रिया केली जाते.

कंपनीत मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे डिस्टिलेशनची प्रक्रिया सुरू असताना १० वाजताच्या सुमारास अचानक प्लँटमधला एक पाईप निसटला आणि त्यातून हवेत गॅस पसरला. हा गॅस थेट बाजूलाच असलेल्या प्रेस फिट नावाच्या कंपनीत घुसला. त्यामुळे तिथे काम करत असलेल्या ३० कामगारांना उलट्या, मळमळ, गुदमरणे असा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी केमिकलचा आम्हाला मोठा त्रास झाल्याचे सांगितले. ही गॅस गळती झाल्याने अचानक कामगारांना उलट्या आणि मळमळ होऊ लागली. काही जणांना चक्करही आली. त्यामुळे कंपनीत एकच धावपळ उडाली. अनेकांनी तात्काळ कंपनीच्या बाहेर धाव घेऊन मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न केला. तर कंपनीत गॅस गळती झाल्याची वार्ता अंबरनाथमध्ये पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ३० जणांपैकी २७ महिला आहेत, तर ३ पुरुष आहेत.

(हेही वाचा : समीर वानखेडेंच्या मागे गुप्तहेर…पोलिस महासंचालकांकडे केली तक्रार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.