परमवीर चक्र विजेत्या योद्ध्यांच्या स्मारकरूपी उद्यानाचे लष्करप्रमुख नरवणेंच्या हस्ते उद्घाटन

114

‘असीम फाउंडेशन’ या पुणेस्थित स्वयंसेवी संस्थेने गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज यांच्या सहाय्याने कॅश्यूरिना, तालुका मोर, पुणे येथे उभरलेल्या परमवीर चक्र विजेल्या योद्ध्यांच्या स्मारकरूपी राष्ट्रीय एकात्मता उद्यानाचे उद्घाटन आज लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्यानामध्ये सर्व परमवीर चक्र विजेत्या योद्ध्यांच्या कथा असलेले फलक, तसेच संबंधित रणांगणाच्या भूप्रदेशाचे मॉडेल्सही मांडली आहेत.

परमवीर चक्र विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी आणि भेट देणाऱ्या व्यक्तीमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करण्यासाठी असीमने राष्ट्रीय एकात्मता उद्यानाची संकल्पना योजली आहे. ज्या ‘भारतासाठी आपल्या वीरांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे तो केवळ जमिनीचा तुकडा नसून प्रत्येकाच्या मनात एकत्वाच्या दृढ़ भावनेबरोबरच सांस्कृतिक वारसा आणि समृद्ध इतिहास यांचे एक जटिल मिश्रण आहे. विशेष बाब म्हणजे, उद्यानात फडकत असलेला भारतीय ध्वज हा जम्मू काश्मीरच्या कुपवाडा येथील महिलांच्या एका गटाने बनवला आहे. येथे आसाम आणि लडाखमधील घरांच्या प्रतिकृती आणि त्या भागातील संस्कृतीचे चित्रण करणाऱ्या कलाकृतीही आहेत. भारताच्या सीमेवरील विविध रणांगणातून संकलित केलेल्या मातीचा एक कलशही इथे ठेवण्यात आला आहे.

(हेही वाचा – पुन्हा प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईला वेग, दुकानांची झाडाझडती सुरु)

उपस्थितांबरोबर संवाद साधण्याआधी जनरल नरवणे यांनी संपूर्ण स्मारकाची पाहणी केली आणि असीम फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांबरोबर बातचीत केली. असीम फाउंडेशनचे सारंग गोसावी यांनी जनरल नरवणेना स्मारकाचे मुख्य आकर्षण असणाऱ्या Rays of Hope’ या भागाविषयी (गोल आकार आणि जांभा खडक निवडण्यामागे परमवीर चक्राच्या पदकाशी असणारे साधर्म्य) माहिती दिली. जनरल नरवणे यांनी आसाम आणि लडाखच्या प्रदर्शनांना भेट दिली आणि त्याबरोबरच उद्यानाच्या भविष्यातील नियोजनाबाबत माहिती जाणून घेतली.

यावेळी बोलताना जनरल नरवणेनी असीम फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि प्रकल्पाशी संबंधित इतरांचे या उद्यानाची संकल्पना तयार करण्यासाठी आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कौतुक केले. या स्मारकाच्या निमिताने पुढील पिढ्या देशाच्या खऱ्या वीरांना कायम लक्षात ठेवतील असेही ते म्हणाले. वेगवेगळ्या राज्यातून आणि परिस्थितीतून पुढे येऊन या सर्वांनी केवळ आपल्या भारतीय असण्याच्या भावनेतून देशवासीयांसाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या या कृतीतून राष्ट्रीय एकात्मतेचे खरे दर्शन होते, असेही ते म्हणाले.

असीम फाउंडेशनच्या वतीने सारंग गोसावी यांनी आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल जनरल नरवणे यांचे विशेष आभार मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदारांचे आणि सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. समारंभामध्ये उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करताना, गोसावी यांनी राष्ट्रीय एकात्मता उद्यान हे समविचारी लोकांसाठी नियमित भेटीचे ठिकाण बनावे तसेच तरुण पिढी परमवीरांच्या कथांनी प्रेरित होऊन भारताच्या भविष्यासाठी सक्रिय योगदान देण्यासाठी प्रेरित होवो अशी आशा व्यक्त केली.

मेजर जनरल विक्र विक्रांत नाईक, एअर मार्शल भूषण गोखले (सेवानिवृत्त) यांच्यासह सशस्त्र दलातील इतर अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या, साम, कुपवाड़ा आणि उरी येथील असीमच्या बेकरीमध्ये काम करणाऱ्या महिलांचा सत्कार जनरल नरवणे यांच्या हस्ते करण्यात आला. गंगोत्रीच्या वतीने गणेश जाधव, मकरंद केळकर आणि राजेंद्र आवटे आणि इतर ज्येष्ठ सदस्यांनी कार्यक्रमाची आणि उद्यानाच्या बांधकामाची देखरेख केली. असीम आणि गंगोत्रीच्या काही हितचिंतकांना या केवळ निमंत्रितांसाठीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली.

राष्ट्रीय एकात्मता उद्यान हे भोरच्या जवळ कुरूंजी गावात भाटघर धरणाजवळ वसलेले आहे. विशेष म्हणजे, बलाढ्य मराठा साम्राज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडाच्या ऐतिहासिक किल्ल्याला लागून असलेले हे एक सुंदर ठिकाण आहे. शनिवार, २५ डिसेंबर, २०२१ पासून हे उद्यान सर्वांसाठी खुले असेल. गंगोत्री हॉलिडेजद्वारे कॅश्यूरिना येथे निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.